होमपेज › Satara › तारळे दिंडी सोहळ्यासाठी तरुणांचा पुढाकार 

तारळे दिंडी सोहळ्यासाठी तरुणांचा पुढाकार 

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 9:09PMतारळे : एकनाथ माळी

श्री संत निळोबाराय महाराजांचा वारसा लाभलेल्या तारळे व आंबळे येथील श्री संत निळोबाराय वारकरी सांप्रदायिक मंडळ आषाढी वारी पायी दिंडी सोहळा गेल्या आठ वर्षांपासून सुरु आहे. युवकांनी सुरु केलेल्या दिंडीच्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर होत आहे. यात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. युवकांनी सुरु केलेला सोहळा दिवसेंदिवस वाढत आहे, हे या सोहळ्याचे वैशिष्टये आहे.

तारळे गावाला मोठा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला आहे.श्री संत निळोबाराय महाराजांचे काही काळ तारळेत वास्तव्य होते.त्यानंतरच्या काळात त्यांचे वंशज र. रा. तथा आबासाहेब नागपुरे यांचेही बराच काळ येथे वास्तव्य होते. येथील श्री संत निळोबाराय मंदिरामध्ये 1982 सालापासून पारायण सोहळा होत आहे. संतांचा वारसा लाभलेल्या तारळेतून पायी दिंडी सोहळा होत नसल्याची सल अनेक वारकर्‍यांच्या मनात होती. याला तरुणांची साथ मिळाली व आठ वर्षांपूर्वी पायी वारी दिंडी सोहळा सुरु झाला. याला ग्रामस्थांचे लाखमोलाचे योगदान लाभले.

तरुण वारकर्‍यांनी पुढाकार घेत जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा सुरु केला. पहिल्या वर्षी 12 दुसर्‍या वर्षी 16 असलेली वारकर्‍यांची संख्या आता 70 पर्यंत पोहोचली असून आंबळे गावच्या वारकर्‍यांचे मोठे योगदान लाभले आहे. सध्या दिंडीमध्ये 25महिला व 45पुरुष असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. सुरुवातीचे दोन वर्षेडोक्यावरून निळोबाराय व तुकाराम महाराजांचा गाथा डोक्यावरुन नेली जात होती. एकाच गाडीतून प्रवास व खाण्यापिण्याची स्वतः सोय करावी लागत होती.आता दिंडीमध्ये पालखी बनविण्यात आली आहे. एवढ्या कमी कालावधीत वारकर्‍यांची संख्या वाढत चालली असून आता एक पीकप गाडी, एक ट्रक, पाण्याचा टँकर सामील असतो.

दिंडीमध्ये तरुणांचा सहभाग मोठा असून त्यांच्या निरोपासाठी गावच्या वेशीपर्यंत शेकडो ग्रामस्थ जात असतात. मुक्कामाच्या ठिकाणी हरिपाठ, भजन, कीर्तन, सकाळी काकडा असे दैनंदिन कार्यक्रम होतात. सुरुवातीला दिंडीमध्ये अनेक समस्यांचा करावा लागत होता. आता नेहमीच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व सुविधा मिळत असल्याचे वारकरी सांगत आहेत.