कुसूरमध्ये युवकाचा खून
  | पुढारी"> 
Sun, May 26, 2019 00:41होमपेज › Satara ›

कुसूरमध्ये युवकाचा खून
 

कुसूरमध्ये युवकाचा खून
 

Published On: Apr 05 2018 12:23AM | Last Updated: Apr 05 2018 12:23AMकराड/ढेबेवाडी : प्रतिनिधी 

पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून व वारंवार खुन्‍नस दिल्याच्या कारणावरून युवकाचा भोसकून खून केला. कुसूर (ता. कराड) येथे मंगळवारी (दि. 3) सायंकाळी ही घटना घडली. पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. उमेश उद्धव मोरे (वय 20, रा. कुसूर, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर गणेश आनंदराव देशमुख (वय 20, रा. कुसूर) असे खूनप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मृत उमेश मोरे हा मलकापूर येथील भारती विद्यापीठात बीसीएच्या तिसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहे. तो गेल्या दोन वर्षांपासून विंग येथे मामाकडे राहात असून, अधूनमधून गावाकडे जात असतो. कुसूर गावची यात्रा असल्याने उमेश गावी गेला होता. मंगळवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उमेशचा भाऊ सुशांत मोरे हा कुसूर एसटी स्टॅन्डवर उभा होता. त्यावेळी गावातीलच गणेश आनंदराव देशमुख तेथे आला आणि त्याने ‘तुला लय मस्ती आहे, तु माझ्याकडे का बघतोय?’ असे म्हणून गणेशने सुशांत मोरेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे आलेल्या उमेश मोरे याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उमेशच्या पाठोपाठ पळत आलेल्या गावातील एकाने (अल्पवयीन) त्याच्याजवळील चाकू गणेश देशमुख याच्याकडे दिला. गणेशने त्या चाकूने उमेशच्या पोटात वार करून त्याला भोसकले. त्यामुळे सुशांत मोरे याने उमेशला त्वरीत बाजूला घेतले. तर गणेश देशमुख व त्याचा जोडीदार तेथून बामणवाडीच्या दिशेने पळून गेले. उमेशच्या पोटातून रक्‍त येत असल्याचे दिसताच सुशांत मोरे याने त्याला उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. 

दरम्यान, कुसूर येथे यात्रे दरम्यान, मारामारी झाल्याचे समजताच कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर व कर्मचारी त्वरीत घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशीरा संशयित गणेश देशमुख याला अटक केली. याबाबतची फिर्याद सुशांत उध्दव मोरे यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर करत आहेत. 

Tags : Satara, Young, murdered, Kasur