Tue, Jul 16, 2019 01:37होमपेज › Satara › पाण्यासाठी तरुणांनी खोदली विहीर

पाण्यासाठी तरुणांनी खोदली विहीर

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 10 2018 11:26PMउंडाळे : प्रतिनिधी

पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेऊन घोगांव, ता. कराड येथे बौद्ध समाजातील तरुण व होतकरु युवकांनी एकत्र येऊन सुमारे 5 लाख रुपये खर्च करून खुदाई करून बांधकाम केलेल्या विहिरीचे उद्घाटन नुकतेच आएएस ट्रेकिंग सेंटर मुंबईचे सनदी अधिकारी यशवंत ओहाळ यांच्या हस्ते व जनरल सर्जन डॉ. अरुण माने, घटनातज्ज्ञ डॉ. सुरेश माने, डॉ. अभिषेक माने, तहसीलदार वैशाली माने, संतोष नायर, प्रा. शिवाजी माने, जयप्रकाश माने, वसंत माने आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

घोगांव येथील बौद्ध वस्तीत वर्षानुवर्षे पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. या टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी समाजातील वरिष्ठांनी एकत्रित येऊन सामूहिक निधी एकत्र करून विहीर खुदाई केली. या विहिरीला मुबलक पाणी लागल्याने समाज बांधवांनी या या विहिरीवरून पाईपलाईनद्वारे समाजातील वस्तीत पाणी आणले. या समाजाचा पाण्याचा मोठा प्रश्‍न सोडवला.  सध्या या विहीरीवरून समाज बांधवांबरोबर इतर समाजातील मंडळींनाही पाण्याचा लाभ  होतो व हे दोन्ही समाज बांधव एकत्र गुण्या गोविंदाने पाणी भरतात. हे समाजाला दाखवून जाती धर्मांच्या भिंती पाडल्या. यासाठी घोगाव येथील समाजाचे ज्येष्ठ नेते वसंतराव माने, जयप्रकाश माने, सुरेश माने यांनी आपल्याजवळील पैसे घातले. यासाठी समाज बांधवांनीही आपल्या परिने आर्थिक मदत केली व हे काम पूर्ण केले. 

या विहिरीचे उद्घाटन व पाणीपूजन समाज बांधवांबरोबर  समाजातील माहेरवासीन महिलांना बोलावून करण्यात आले. यावेळी माहेरवासिन महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. या एकीने व कामामुळे समाजबांधवांतून आनंद व्यक्त केला जात आहे.