Fri, Apr 26, 2019 18:12होमपेज › Satara › सायबर क्राईमवर आळा शक्य

सायबर क्राईमवर आळा शक्य

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 24 2018 8:08PMसातारा : प्रतिनिधी

येत्या पाच वर्षात पोलिस ठाण्यांमध्ये सायबर क्राईमचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण सर्वाधिक राहणार असून समाजातील प्रत्येक घटकांनी व खास करुन युवती, महिलांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. मोबाईलसह तंत्रज्ञान वापरताना काळजीपूर्वक व माहितीपूर्ण वापरल्यास कोणताही त्रास व आपली फसवणूक होणार नाही, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.

पत्रकारांसाठी ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र या प्रकल्पाअंतर्गत सातारा जिल्हा पोलिस दल व माहिती कार्यालयावतीने  सायबर जाणीव जागृतीच्या एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी माहिती अधिकारी युवराज पाटील, पोनि पद्माकर घनवट, सपोनि गजानन कदम उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील पुढे म्हणाले, सध्या डिजिटल युग असून चोरटेही अ‍ॅडव्हान्स झाले आहेत. येत्या चार ते पाच वर्षात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढणार असल्याने राज्य शासनाने सायबर पोलिस ठाणी सुरु करुन प्रतिबंध करण्यासाठी मोठे पाऊल टाकले आहे. देशामध्ये महाराष्ट्राचे याबाबतचे काम उल्‍लेखनीय असून सातारा मुख्यालयाच्या पाठीमागे सायबर पोलिस ठाणे आहे. मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअपसह सोशल मीडियावर फसवणूक करण्यासाठी चोरट्यांचाही मोठा वावर आहे. यामुळे आक्षेपार्ह वाटल्यास तत्काळ याबाबतची माहिती सायबर पोलिस ठाण्याला द्या, असे आवाहन त्यांनी केले.

सपोनि गजानन कदम यांनी सायबर क्राईमविषयी पॉवर पाईंटद्वारे सायबर क्राईम कसा होतो व तो कसा टाळावा याबाबतचे सादरीकरण केले. सातारा जिल्ह्यात एक वर्षात झालेल्या सायबरच्या विविध गुन्ह्यांविषयी त्यांनी माहिती देऊन फसगत टाळण्याच्या टिप्स दिल्या. महिला, युवतींनी पर्सनल फोटो टाकताना ते कस्टमाईज करण्याची काळजी घ्यावी. बाहेर फिरायला गेल्यानंतर फेसबुक व अपडेट देण्याचे टाळावे व फिरुन आल्यानंतर फोटो टाकावेत. सोशल मीडियाद्वारे महिला, युवतींचे फोटो काढून त्याद्वारे गुन्हेगारांकडून अश्‍लील फोटो तयार केले जातात. अशावेळी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास त्या व्यक्‍तीचा शोध घेणे सहजशक्य आहे. यामुळे घाबरुन न जाता तक्रार देण्याचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, वधूवर सूचक केंद्राच्या माध्यामातून होणारी फसवणूक, नायजेरीयन फ्रॉड, हॅकींग, फिशिंग, नोकरीविषयक होणारी फसवणूक याचे प्रमाणही लक्षणीय असून खबरदारी घेतल्यास फसगत टाळता येवू शकते, अशी माहितीही कदम यांनी दिली. दरम्यान, यावेळी माहिती अधिकारी युवराज पाटील यांनीही मनोगत व्यक्‍त केले. या कार्यशाळेसाठी सातार्‍यातील पत्रकार उपस्थित होते.