Mon, Mar 18, 2019 19:35होमपेज › Satara › कराड दक्षिणचा येळगाव परिसर समस्यांच्या गर्तेत

कराड दक्षिणचा येळगाव परिसर समस्यांच्या गर्तेत

Published On: Jul 02 2018 1:49AM | Last Updated: Jul 01 2018 8:16PMयेळगाव : आनंदा शेवाळे

कराड दक्षिणमधील डोंगरी भाग म्हणून ओळखला जाणार्‍या येळगावसह परिसर समस्यांचा गर्तेत सापडला आहे. सोयी-सुविधा मिळत नसल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर असून गैरसोयींमुळे जनतेचे हाल होत आहेत.सरकारी काम अन् 

अनेक वर्षे थांब..

सरकारी काम आणि सहा महिने थांब अशा आशयाची म्हण आता केंव्हाच मागे पडली असून सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब ही म्हण आता अंमलात येऊ लागल्याचा अनुभव कराड तालुक्यातील येळगांव परिसरातील पशुपालक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहेत. शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूग्धव्यवसायाकडे मोठ्या आशेने पाहिले जाते आणि ते खरेही आहे.

माणसांच्या आरोग्य केंद्राची दाद नसताना येथील शेतीप्रिय पशुपालक शेतकर्‍यांनी आपली दहा गुंठे जमीन विना मोबदला पशुसंवर्धन खात्याच्या पशुपैदास उपकेंद्रासाठी दानपत्र करून दिली. त्यामुळे येळगांव सह डोंगरी विभागातील पशुपालन करणार्‍या शेतकरी वर्गाची जनावरांच्या उपचाराची चांगली सोय झाली. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या पशुपैदास उपकेंद्रात कार्यरत असलेल्या पशुधन पर्यवेक्षकांच्या हाताखाली असणार्‍या कंपौंडर अर्थात परिचराची बदली झाली त्यापासून आजतागायत येथे ही जागा रिक्त आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून येथे कार्यरत असलेल्या एकुलत्या एक डॉक्टर म्हणजेच पशुधन पर्यवेक्षकांचीही पशुसंवर्धन खात्याने इतरत्र बदली करुन आपल्या दळभद्री कारभाराचा नमुना दाखवून दिला. यामुळे येळगांव सह परिसरातील पशुधन अक्षरशः उपचाराविना वार्‍यावर सोडले. याकाळात खात्यानेच शेतकर्‍यांना दगा दिल्याने अनेकांची जनावरे रात्री अपरात्री आजारी पडून उपचाराअभावी दगावली तर आजही बळीराजाला परवडत नसणार्‍या खासगी व्यावसायिकांकडून  आपल्या जनावरांवर ना इलाजाने महागडे उपचार करावे लागत  असल्याने येळगांवला पशुपैदास उपकेंद्र म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी गत होऊन बसली आहे. 

संरक्षक कठडे नसल्याने पूल धोकादायक

टाळगांव ता. कराड येथील गावानजीक दक्षिण मांड नदीवर  असलेल्या पुरातन बिगर कठड्याच्या पूलाची दुरावस्था झाली असून संरक्षक कठडे नसल्याने हा पूल अपघाताला निमंत्रण देत आहे. या पूलाची उंची वाढवून तो नव्याने बांधण्याची मागणी जनतेमधून होत आहे. तसेच टाळगांव येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचीही डागडुजी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

गोटेवाडीत सांडपाणी रस्त्यावर

गोटेवाडी ता.कराड येथील सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजनेला अनेक ठिकाणी गळतीचे ग्रहण लागले असून येथे नाल्यांअभावी सांडपाणी थेट रस्त्यांवरुन वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

येणपे फाटा- येणपे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

येणपे ते येणपेफाटा रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने तो दुरुस्त करण्याची मागणी येणपे ग्रामस्थांनी केली आहे. शेवाळेवाडी(येणपे) येथील ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे अनेक ग्रामस्थांचे म्हणणे असून याबाबत अनेक वेळा मागणी करूनही संबंधित अधिकारी दाद देत नसल्याची खंत ज्येष्ठ नागरिक व्यक्त करीत आहेत.

रस्त्याअभावी रुग्णांचे हाल

येवती ता.कराड येथे सर्व सोयीनीयुक्त  असे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मात्र आरोग्य केंद्र खास आणि जोडरस्त्या अभावी होतोय त्रास अशी परिस्थिती असून अनेक वेळा मागणी करूनही हा प्रश्‍न सुटत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच येवती येथे गावाला पाणी पुरवठा करणार्‍या सार्वजनिक बोअरवेल जवळच गटर तुंबून सांडपाणी थेट रस्त्यावरुन वाहत असल्याने पाणी पुरवठा दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेळकेवाडी (येवती) येथील पुरातन तालिम अर्थात व्यायाम शाळेची दुरावस्था झाली असून संबंधित अधिकारी यांनी याकामी लक्ष घालून तालमीची डागडुजी करण्याची मागणी शेळकेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

उघडा डी.पी. मृत्यूचा सापळा 

महावितरणचे उघडे डी.पी. वाढवताहेत जनतेचे बी.पी.अशीच काहीशी अवस्था होऊन बसली आहे. जूनमध्ये जिल्ह्यातील अनेकांना वीजेच्या शॉकमुळे आपल्या प्राणांना मुकावे लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर महावितरणने अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र अनेक ठिकाणी सताड उघडे ट्रान्सफार्मर म्हणजेच डी.पी., लोटांगणाच्या अवस्थेत असणारे पोल, अस्ताव्यस्त वीजेच्या तारांचे झोळ, विद्युत पोल, तारा तसेच डी.पी.ना झाडाझुडुपांमुळे घातलेला विळखा तसेच कधीही कोसळतील असे जुनाट व जीर्ण पोल तसेच विद्युत तारा असे एक ना अनेक प्रश्‍न समस्या बनून आ वासून समाजापुढे उभे आहेत. मात्र तिमाही वीज बीले मासिक करून वीज ग्राहकांनाच खिंडीत पकडणार्‍या महावितरणला याचे कितपत गांभीर्य आहे ते त्यानाच माहित. घोटाळा किंवा दुर्घटना घडल्याशिवाय तिकडे बघायचेच नाही असे संबंधित खात्याचे धोरण असल्याने याबाबत दाद तरी कुणाकडे मागायची हाच खरा प्रश्‍न आहे. सुमारे दहा लाख रूपये खर्चून प्रथमच मस्करवाडी (येळगांव) येथे तयार करण्यात आलेल्या काँक्रिट रस्त्याची उद्घाटनापूर्वीच वाताहत झाली असून याची डागडुजी करण्याची  मागणी मस्करवाडी ग्रामस्थांनी केली आहे.