Wed, Jul 17, 2019 08:32होमपेज › Satara › सिक्कीममध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

सिक्कीममध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

Published On: Mar 13 2018 1:43AM | Last Updated: Mar 12 2018 10:54PMकराड : प्रतिनिधी

सिक्कीम येथे नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. 

यावेळी श्रीनिवास पाटील म्हणाले, बालपणी मला स्व. चव्हाण साहेबांचे प्रेम मिळाले.   भारतीय प्रशासन सेवेत महाराष्ट्रभर वेगवेळ्या पदावर सेवा बजावली.  भारतीय प्रशासकीय सेवेतून मी स्वेच्छेने सेवानिवृत्ती घेतली व पुढे  दोनवेळा कराड लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून देश पातळीवर प्रतिनिधित्व केले.

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पंडित नेहरू यांच्या हाकेला प्रतिसाद देऊन भारताचे संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी  स्वीकारली. पुढे त्यांना भारताच्या गृहमंत्री पदाची धुरा पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे आग्रहावरून, स्वीकारावी लागली. 

सिक्किमच्या जनतेने 14 एप्रिल  1975 रोजी सिक्किममध्ये झालेल्या सार्वमताचे आधारावर सिक्किमला भारतामध्ये सामील करून घेण्याची विनंती पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांना केली. ती विनंती प्रस्तावाचे स्वरुपात गृहमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांनी लोकसभेच्या पटलावर 26 एप्रिल  1975 रोजी मांडली. त्या दिवशी उपस्थित असलेल्या सभासदांनी दोनतृतियांश बहुमताने तो ठराव पारित केला आणि त्याचमुळे सिक्किमचा समावेश भारतीय  प्रजासत्ताकातील 22 वे राज्य म्हणून  36 व्या राज्यघटना दुरुस्तीनंतर 16 मे  1975 पासून झाला. त्यामुळे सिक्किम  राज्यात राजेशाही संपून लोकशाही राज्यनिर्मिती झाली आणि राज्यपाल पदाची सुरुवात झाली.

स्व. यशवंतरावांच्या आशीर्वादाने त्यांच्याच जन्मभूमी-कर्मभूमीतला मी हिमालयाच्या कुशीतील शांतताप्रिय सिक्किम राज्याचा पंधरावा राज्यपाल म्हणून 20 जुलै  2013 पासून सेवारत आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाने लाभलेल्या शिकवणुकीचे आजपर्यंत पालन मी केले व यापुढेही करीत राहीन, अशा शब्दात श्रीनिवास पाटील यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली.