Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Satara › कराडमधील प्रेरणादायी यशवंतराव चव्हाण म्युझियम 

कराडमधील प्रेरणादायी यशवंतराव चव्हाण म्युझियम 

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 7:33PMकराड : प्रतिभा राजे

‘कराड येथे जमीन घेवून वास्तू बांधावी व त्या वास्तुत माझ्या स्वत:चे ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत  व माझ्या जीवनातील अनेक व्यक्‍तिंनी व संस्थांनी मला भेटवस्तु दिल्या आहेत त्याचे संरक्षण व्हावे व वस्तुसंग्रहालयाच्या रूपाने त्याचे जतन व्हावे असे’ अशी इच्छा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्‍त केली होती.  त्यांच्या या इच्छेची पूर्ती करण्यात आल्याने त्यांचा हा अनमोल ठेवा वर्षानुवर्षे नव्या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. 

कराड येथे  ‘विरंगुळा’ बंगल्यामध्ये स्व. चव्हाण व स्व. सौ. वेणूताई यांच्या अनेक आठवणी वस्तुरूपात जतन केलेल्या आहेत. तर वेणुताई चव्हाण सभागृहाशेजारी स्व. यशवंतराव चव्हाण यांनी वापरलेल्या विविध  वस्तु, त्यांना भेट म्हणून मिळालेल्या अनेक वस्तु जतन केलेल्या आहेत. म्युझियममध्ये प्रवेश केेल्यावरच डावीकडे दोन कोच, टेबल दिसून येतात. अगदी यशवंतराव चव्हाण यांच्या रूबाबदारीची साक्ष हे कोच देतात. त्याच टेबलवर स्व.चव्हाण वापरत असलेला चष्मा, गीता प्रवचन, इंग्रजी ग्रंथ, दैनंदिनी आणि भला मोठा पेन दिसून येतो.

या वस्तु पाहिल्यावर स्व. चव्हाण यांच्या अस्तित्वाची नकळत जाणीव होते. उजवीकडे स्व. चव्हाण, सौ. वेणूताई यांचे फोटो व त्याखाली त्यांना विविध प्रांताकडून भेट मिळालेलेे ढाल, तलवार, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे स्मृतिचिन्ह दिसून येते. डावीकडून पुढे काचेच्या कपाटामध्ये त्यांनी दिल्‍लीहून खास आठवण म्हणून आणलेल्या वस्तू, राजस्थानहून त्यांना भेट मिळालेल्या वस्तू, रणगाड्याची प्रतिकृती, स्व. चव्हाण यांचा दुर्मिळ फोटो, श्रीगणेशाचा पुतळा दिसून येतो.  स्व. चव्हाण यांना मेघालयमधून मिळालेले हस्तीदंतही दिसून येतात. यशवंतराव यांच्याकडे प्रत्येक विषयात दुरदृष्टी होती. राजकीय जीवनातच नव्हे तर साहित्य, संस्कृती, शिक्षण या क्षेत्रातही त्यांचे योगदान मोलाचे आहे. 

ते ज्या-ज्या ठिकाणी जात त्या-त्या ठिकाणी त्यांना मिळालेल्या या दुर्मिळ वस्तुंचा नजराना नव्या पिढीसाठी त्यांनी बहाल केला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण वापरत असलेला कोट आदी कपडे तर स्व. वेणूताई वापरत असलेल्या साड्या, शाल यांचाही समावेश आहे. काठी, बुट, बॅग यांचेही जतन केले आहे.  स्व. चव्हाण रसिक व साहित्यिकही होते. ‘युगांतर ’, ‘सह्याद्रीचे वारे’, ‘कृष्णाकाठ’, ‘ऋणानुबंध’ ही त्यांची साहित्यसंपदा आहे. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्‍तिमत्व  होते. त्यामुळेच त्यांच्या ग्रंथसंपदा जपून ठेवण्यात आल्या असून त्याचे दालन करण्यात आले आहे. त्यामध्ये स्व. चव्हाण यांनी लेखन केेलेल्या विविध साहित्य संपदेबरोबरच अनेक उत्कृष्ठ लेखकांची पुस्तके व ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. या ग्रंथदालनाशेजारीच अभ्यास खोली करण्यात आली असून याठिकाणी त्या पुस्तकांचे वाचन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या थोर विभुतीला जाणून घेणे, समजून घेणे यासाठी फार मोठा अभ्यास करण्याची गरज आहे. मात्र, त्यांची वास्तु आणि वस्तु या नवीन पिढीला प्रेरणादायी ठरणार्‍या आहेत. 

स्व. यशवंतराव चव्हाण यांचे इच्छापत्र

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी एक इच्छापत्र लिहून ठेवले होते. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,  ‘माझी पत्नी कै. सौ. वेणूताई हिचे स्मरणार्थ मी एक सामाजिक न्यास करणार आहे. तिने मला खासगी व सार्वजनिक जीवनात अनमोल साथ दिली. त्यासाठी तिची आठवण जागती ठेवणे हा माझ्या जीवनातील उरलेला एकच आनंद आहे. त्यादृष्टीने माझ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. माझ्या गावी कराड येथे एखादी जमीन विकत घेवून त्यावर एखादी वास्तु बांधावी व अशा वास्तूत माझ्या स्वत:चे ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत. तसेच माझ्या जीवनात अनेक व्यक्‍तिंनी व संस्थांनी अनेक वस्तु मला प्रेमाने भेट म्हणून दिलेल्या आहेत. त्यांचेही संरक्षण व्हावे व वस्तुसंग्रहालयात त्याचे जतन व्हावे, अशी माझी इच्छा आहे. आणि हे ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय ही माझ्या पत्नीची स्मृती म्हणून जपण्याची योजना करावी, असा संकल्प आहे.’ 

यशवंतराव चव्हाण यांची अ‍ॅम्बेसिडर...

स्व. यशवंतराव चव्हाण ज्या कारमधून दौरे करत असत ती कार याच वास्तूत   ठेवली गेली आहे. या कारचीही काळजी घेतली जाते. स्व. यशवंतराव चव्हाण जाणून घ्यायला येणार्‍यांना या कारचे विशेष कौतुक वाटते.