Wed, Jul 24, 2019 14:08होमपेज › Satara › मराठीसाठी साहेबांएवढे प्रयत्न कोणीच केले नाहीत

मराठीसाठी साहेबांएवढे प्रयत्न कोणीच केले नाहीत

Published On: Feb 27 2018 8:59AM | Last Updated: Feb 27 2018 8:59AMकराड : चंद्रजित पाटील

इंग्रजांच्या जोखंडातून 150 वर्षांनी मुक्तता मिळाल्यानंतर प्रजासत्ताक भारतात भाषावर प्रांतरचना होऊन 1 मे 1960 ला महाराष्ट्र अस्तित्वात आला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांनी त्यानंतर मराठी भाषा आणि तिच्या विकासासाठी जेवढे प्रयत्न केले, तितके प्रयत्न दुर्दैवाने त्यानंतर आजवर झालेच नाहीत. 

मराठी भाषिकांचे राज्य म्हणून उदयास आलेल्या महाराष्ट्रात स्व. यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा शासन व्यवहाराची भाषा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले. त्यासाठी त्यांनी ‘भाषा संचालनालया’ची निर्मिती केली. तसेच मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. मराठी भाषेचे संरक्षण, संवर्धन आणि विकास हे राज्य शासनाचे धोरण राहिले आहे.

भाषा केवळ संवादाचे साधन आहे, असे मानल्यास गल्लत होईल. संवादाच्या साधनाबरोबरच संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भाषा संचालनालय, संस्कृती मंडळाने मराठी भाषेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. त्याचबरोबर ‘मराठी विश्‍वकोष निर्मिती’ मंडळाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहितीचा खजिनाच आपल्यासाठी खुला केला. वर्षापूर्वी या मराठी विश्‍वकोषाचे आधुनिकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले.

मराठी विश्‍वकोषाचा पहिला खंड 40 वर्षापूर्वी प्रकाशित झाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी विश्‍वकोषाचा 20 वा खंड प्रकाशित झाला होता. विश्‍वकोषाचे खंड पूर्ण होण्यास लागलेल्या या प्रदीर्घ कालावधीमुळे त्यातील अनेक नोंदी, माहिती कालबाह्य झाली आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधन, विविध विषयांसह ज्ञानशाखेतील झालेले बदल विचारात घेणे आवश्यक आहे. हे बदल जलद गतीने होतानाच अद्ययावतीकरण करताना विश्‍वकोषाचा मूळ दर्जा कायम राहिला पाहिजे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व ज्ञान क्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करणे, त्यांचे समीक्षण, संपादन करून अंतिम नोंद केली जाणार आहे. त्यासाठी विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या सहकार्याने स्थापन करण्यात येणार्‍या ज्ञान मंडळांच्या माध्यमातून अद्ययावतीकरणाचे काम सुरू करण्यात आले.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्‍वकोष प्रकाशित होणारी मराठी ही एकमेव प्रादेशिक भाषा असावी. भाषेचा अधिक गतीने विकास व्हावा, म्हणून राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना करण्यात आली. राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात स्वतंत्र अशा मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात येऊन भाषा संचालनालय, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था यांना मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आणण्यात आले.

महाराष्ट्राचे भूषण ठरलेले कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेबद्दल गौरव म्हणून वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. 

गेल्या दशकापासून अनेक आव्हानांना सामोरे जात मराठी अधिकाधिक समृद्ध होत आहे. भाषा म्हटले की सर्वप्रथम शिक्षणक्षेत्र डोळ्यासमोर येते. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची गेल्या दशकभरातील घटते प्रमाण चिंताजनक असून मराठी भाषेचा विकास कसा होणार? असा प्रश्‍न निर्माण होणे साहजिकच आहे. शिक्षणाचा संबंध दैनदिंन जीवनाशी येतो.आज वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची ओरड सुरू असल्याचे पहावयास मिळते. मात्र आजच्या सोशल मीडियाच्या युगात पुस्तक वाचण्याचे प्रमाण भलेही कमी झाले असेल पण वाचनाचे माध्यमही झपाट्याने बदलले आहे, हे विसरून चालणार नाही. युवा पिढीला आज इंटरनेट भावल्याने सोशल मीडिया व्यापक बनला आहे. त्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातून माहितीचे, भाषेची अधिक देवाण - घेवाण होणे आवश्यक आहे. 

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर त्यांच्याइतके प्रयत्न मराठी भाषा समृद्ध बनवण्यासाठी झालेच नाहीत. तसेच झाले असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. मात्र तरीही आज नवीन तंत्रज्ञानानुसार मराठी भाषेचे माध्यमही बदलल्यास मराठी भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, हे निश्‍चित !

भाषेच्या संवर्धनासाठी कायदे पण....

 मराठी भाषेच्या संवर्धनासाठी शासनाने कायदे केले आहेत. मात्र या कायद्यांची अंमलबजावणी कितपत होते? याबाबत नेहमीच प्रश्‍न उपस्थित केले जातात. त्यामुळे मराठी नावांच्या पाट्यासाठीही दुकानाचे  फलक आजही  फोडले  जातात. तर मराठी शाळा ओस पडत असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांना चांगले दिवस आले आहेत. मात्र असे असले तरी इंग्रजी अथवा मराठी माध्यमांची शाळा असा भेद न करता इंग्रजी शाळामधूनही दर्जेदार मराठी भाषेचे ज्ञान दिल्यास मराठी भाषेची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही.