Wed, Jul 17, 2019 20:23होमपेज › Satara › तिसर्‍या दिवशी तुडुंब गर्दी 

तिसर्‍या दिवशी तुडुंब गर्दी 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधीं

यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनात 400 हून अधिक स्टॉलचा सहभाग असणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी तीन दिवसात शेतकर्‍यांनी झुंबड उडाली. शासनाच्या शेतीविषयक नवीन योजना, नवे तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, कर्ज व्यवस्था आदींची माहिती घेण्यासाठी शेतकर्‍यांनी गर्दी केली आहे. प्रदर्शनातील डॉग शो नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. यामध्ये तेटगुल, गे्रटडेन, आक्रम डॉग, रॉटपिलट, लॅब, बुलडॉग, पमडॉग आदी डॉग पाहण्यासाठी गर्दी होत आहे. 

प्रदर्शनाचे यावर्षी 14 वे वर्ष आहे. साखळी सिमेंट बंधारे, आदर्श गावांचे मॉडेल, कुक्कुटपालन, कोरडवाहू शेतीतील तंत्रज्ञान, ऊस विकास याचीही माहिती स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. दुष्काळातील नियोजनासाठी शेतीवरील पाणी व्यवस्थापन यामध्ये गांडुळखत युनिट, जलसंपदा विभाग, शेतीकर्ज माहिती देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र बँक असे शासन, जिल्हापरिषद, पंचायत समिती यांच्यावतीने स्टॉलमधून शेतकर्‍यांना ज्ञान देण्यात येत आहे.  

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांनी उत्पादित केलेली फळे, फुले, भाज्या, ऊस प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. 42 कांड्यांचा ऊस शेतकर्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे. शेती आधारीत उद्योगांना चालना, कृषी उत्पादन वाढविणे, उद्योजकता प्रशिक्षण, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, कृषी मालाचे विपणन याची माहिती प्रतिकृतीच्या माध्यमातून दिली जात आहे. याशिवाय घरगुती साहित्य, औषधी वनस्पती, कपडे, खते, बियाणे, मासिके, महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थांचे स्टॉल गर्दीने फुलून गेले आहेत.  

फुले प्रदर्शन स्पर्धा व गाय, म्हैस, बैल स्पर्धा झाल्या. शेतकर्‍यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विविध जातीची आकर्षक फुले या स्पर्धेत सहभागी करण्यात आली होती. तर जनावरांच्या स्पर्धेत जातीवंत व देखण्या जनावरांची मोठी वर्दळ पहायला मिळाली. देखणी जनावरे पाहून शेतकरी भारावून गेले. याचबरोबर अवजड कृषी तंत्रज्ञान इरिगेशन, खते, व औषधेकृषी पर्यटन सल्‍ला, काढणी पश्‍चात मालाचे व्यवस्थापन, सेंद्रिय खते, औषधे, कृषी पर्यटन सल्‍ला आदींची माहिती दिली जात आहे.