होमपेज › Satara › पोटच्या गोळ्याला सोडून ते कायमचेच निघून गेले

पोटच्या गोळ्याला सोडून ते कायमचेच निघून गेले

Published On: Dec 12 2017 2:10AM | Last Updated: Dec 11 2017 11:00PM

बुकमार्क करा

म्हसवड : पोपट बनसोडे

माणमधील दुष्काळी परिस्थितीने खचून न जाता शिक्षण पूर्ण करून मुंबईत वैद्यकीय व्यवसायात आपला जम बसवणारे डॉ. यशवंत माने यांच्या कारला अपघात होऊन अवघे कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेले. पोटच्या गोळ्याला सोडून ते कायमचेच निघून गेले. एका अपघाताने होत्याचे नव्हते झाले. डॉ. माने यांनी अतिशय कष्टाने गरिबीवर मात करून आपले वैभव उभे केले होते. त्या यशस्वी कारकिर्दीची मात्र दुर्देवी अपघाताने अखेर झाली. 

माण तालुक्यातील काळचौंडी गाव तालुक्यातील कायमच  दुष्काळाच्या झळा सोसत आले आहे. या  भागात शेती बेभरवशाची असल्याने अनेक कुटुंबे डबघाईला आली आहेत. यापैकी काळचौंडीचे पांडुरंग माने यांचे कुटुंब होते. त्यांनी आपल्या तीन मुलांना अतिशय गरिबीतून शिक्षण दिले होते. पैकी यशवंत यांनी खडतर परिश्रम घेऊन शिक्षण पूर्ण केले व गावाकडे राहून प्रगती करता येणार नाही, म्हणून त्यांनी पॅथालॉजीचे शिक्षण घेऊन मुंबई चुनाभट्टी येथे पॅथालॉजीची ओपीडी सुरू केली. या व्यवसायामध्ये त्यांनी रात्रीचा दिवस करून वैभव निर्माण केले होते.

नावाप्रमाणे व्यवसायात यशवंत होऊन प्रगती केली होती. तथापि, गावाच्या मातीला ते कधीच विसरले नाहीत. तर त्यांनी जे सोसले ते मुलांना सोसायला लागू नये, त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ते नेहमी आग्रही असत. मुलगी शुभांगी ही मायणी ता. खटाव येथे मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे तर मुलगा 12 वीत मुंबई येथे शिकत होता. अविरत संघर्षातून आपले आयुष्य सुंंदर घडवणारे हे कुटुंब यशाच्या शिखरापर्यंत गेलेले नियतीला पहावले नाही. रविवारच्या रात्री काळाने त्यावर घाला घातला. 

माने कुटुंब रविवारी काळचौंडी येथे ग्रामदैवत काळभैरवाची जत्रा करण्यासाठी आले होते. दिवसभर भावकीसह येणार्‍या पाहुण्यांची जातीने उठबस केली. आग्रहाने जेवणावळी उठवल्या. सौ.शारदा माने यांनी मार्गशीर्ष महिना असल्याने त्यादिवशी शाकाहार घेतला. दिवसभर कार्यक्रम उरकून सर्व गावकर्‍यांचा व पाहुण्यांचा निरोप घेऊन हे कुटुंब रात्री 11 वाजता परत मुंबईला निघाले. डॉ. यशवंत माने यांनी अगोदर शुभांगी हिला मायणी येथे सोडले. यावेळी मुलगी मुंबईला येण्याचा हट्ट करत होती. परंतु शेवटचे वर्ष आहे.

अभ्यास बुडू नये, म्हणून तिला मायणीत ठेवले व ते मुंबईच्या प्रवासाला लागले. पुण्याजवळ गेल्यानंतर मुलगा गाडी चालवत असताना एका ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली व झालेल्या अपघातात कुटुंब जागीच ठार झाले. अतिशय कष्टातून आपले भवितव्य घडवून मुलांच्या भवितव्यासाठी आग्रही असणार्‍या डॉ. यशवंत माने यांच्या कुटुंबावर असा काळाचा घाला  पडल्याने काळचौंडी परिसर सुन्न झाला आहे.