Tue, Apr 23, 2019 09:47होमपेज › Satara › लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर अनंतात विलीन

लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर अनंतात विलीन

Published On: May 17 2018 1:24AM | Last Updated: May 16 2018 10:33PMवाई : प्रतिनिधी 

लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर (102) यांची अंत्ययात्रा काढल्यानंतर ‘यमुनाबाई वाईकर अमर रहे, आम्ही जातो आमुच्या गावा.., चुकले तुझे बाळ.. ये ना माझे आई गं..’ अशा भावपूर्ण गीतांची सलामी देत यमुनाबाई वाईकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बुधवारी सकाळी फुलांनी सजविलेल्या रथात तिरंग्यात लपेटलेले पार्थिव ठेऊन त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. सोनगिरवाडी येथील कोल्हाटी समाज दफन भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी  बंदुकीतून तीन फैरी झाडून व शोक बिगुल वाजवून यमुनाबाईंना मानवंदना दिली.

आ. मकरंद पाटील, मदन भोसले, तहसीलदार अतुल म्हेत्रे, पोनि अशोक शेळके, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. तसेच मधुकर नेराळे, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, मोहन भोसले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शशिकांत पिसाळ, प्रतापराव पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष सचिन घाटगे यांनी आदरांजली वाहिली. 

उपनगराध्यक्ष अनिल सावंत, शशिकांत जाधव, क्रांती थिएटर्सचे अमर गायकवाड, चंद्रकांत जावळे, अ‍ॅड. प्रतापसिंह देशमुख, प्रतापराव पवार, लक्ष्मीकांत रांजणे, शिवाजीराव जगताप, शाहीर सोनावणे, मनोहर पटवर्धन, धोंडीराम जावळे, दिनेश गाडे, मच्छिंद्र जाधव,  नृत्यांगना रेश्मा परितेकर आदींनी यमुनाबाईंना श्रध्दांजली अर्पण केली. 

लावणी सादर करणार्‍या शेवटच्या कलावतीचा अस्त झाला आहे. अशी लावणी यापुढे कोणीही ऐकवू, दाखवू शकेल असे वाटत नाही, अशा भावना नेराळे यांनी व्यक्त केल्या. लोकसंगीताचे प्रचंड भांडार यमुनाबाईंकडे होते. लावणी, तमाशा या लोककलांना त्यांनी सातासमुद्रापार नेले. त्यांच्या लावणीला सामान्य रसिकांपासून राष्ट्रपतींपर्यंत मानमान्यता लाभली. संगीत-नाटक अकादमी, पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित या कलावतीचं जाणं सामाजिक, सांस्कृतिक व कला क्षेत्राची फार मोठी हानी असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी सांगितले.  

मदन भोसले म्हणाले, लावणीसम्राज्ञी यमुनाबाई यांच्या जाण्याचे दुःख खूप मोठे आहे.  आपल्या वैशिष्टयपूर्ण लावणी गायनाने त्यांनी महाराष्ट्राचे लोककला वैभव सतत वाढते ठेवले. सलग 60 वर्षे संगीतबारीच्या माध्यमांतून त्यांनी कलेची व रसिकांची सेवा केली. तमाशा, लावणी या क्षेत्राला जेव्हा प्रतिष्ठा नव्हती, त्याही काळात यमुनाबाईंचे नाव आदराने घेतले जात होते. असे अलौकिक व्यक्तिमत्व आम्ही गमावले आहे. 

माजी आमदार लक्ष्मण माने, विजया भोसले, नगराध्यक्षा सौ. प्रतिभा शिंदे, डॉ. दत्तात्रय घोरपडे, सी. व्ही. काळे, पोपटलाल ओसवाल, शामराव देव, रोहिदास पिसाळ, अ‍ॅड. अरविंद चव्हाण, महेंद्र धनवे, सतीश वैराट, विजय ढेकाने, अजित वनारसे, सुधीर शिंदे यांच्यासह मान्यवरांनी दर्शन घेतले.