होमपेज › Satara › यमाईदेवी रथोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी

यमाईदेवी रथोत्सवाला लाखो भाविकांची हजेरी

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:38PM

बुकमार्क करा
औंध : वार्ताहर

राज्यासह परराज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा रथोत्सव आई ‘उदे गं अंबे उदे’च्या जयघोषात अपूर्व उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. 

ऐतिहासिक व शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेल्या औंधच्या श्री यमाईदेवी रथोत्सवास दुपारी बारा वाजता प्रारंभ झाला. तत्पूर्वी माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार व श्री यमाई देवस्थानच्या चिफ ट्रस्टी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीच्या मंदिरातील ग्रामनिवासी यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे षोड्षोपचारे पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून त्यानंतर उत्सवमूर्ती सभामंडपात आणण्यात आली. यावेळी हर्षिताराजे पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे नंदकुमार जोशी, अनिकेत इंगळे, यांनी पौरोहित्य व मंत्रपठण केले. दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापना करण्यात आली.

त्या ठिकाणी मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते विधिवतपणे देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन चारूशीलाराजे पंतप्रतिनिधी यांंच्या हस्ते  देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. त्याठिकाणी माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या हस्ते देवीची ऐतिहासिक दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी चारूशीलाराजे, हर्षिताराजे, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, प. पू. सुंंदरगिरी महाराज, सुनील माने, शिवाजी सर्वगोड, संदिप मांडवे, सी. एम. पाटील, धैर्यशील कदम, सुरेंद्र गुदगे, सतीश फडतरे, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, रमेश जगदाळे, इलियाज पटवेकरी, सरपंच नंदिनी इंगळे, सचिन शिंदे, सोनाली खैरमोडे, प्रशांत खैरमोडे, नवल थोरात, चंद्रकांत पाटील, मनोज पोळ, शंकरराव खैरमोडे आदी प्रमुख उपस्थित होते.

त्यानंतर रथोत्सवास उत्साही मंगलमय वातावरणात सुरूवात झाली. रथाचे मानकरी माळी, भाविक, ग्रामस्थ यांनी रथ ओढून मिरवणूकीस प्रारंभ केला. राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्रीयमाई देवीचे दर्शन घेऊन रथावर एक रूपयांपासून ते दहा हजार रूपयांपर्यंतच्या नोटा, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल खोबरे अर्पण केले  व आई उदे ग अंबे उदेचा जयघोष केला.  

दुपारी बारा वाजता निघालेली रथ मिरवणूक पेठगल्ली, होळीचा टेक, ग्रामसचिवालय मार्गे, येथील पद्माळे तळ्यावर नेण्यात आला. त्याठिकाणी तळ्यामध्ये देवीच्या उत्सवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मोकळाई देवीच्या भेटीनंतर सायंकाळी 7 वाजता रथाची फेरी राजवाडा पटांगणावर आणण्यात आली. त्यानंतर उत्सवमूर्तीची मूळस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी औंध पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.