Thu, Jun 27, 2019 16:42होमपेज › Satara › उंब्रज येथील सर्व्हिस रस्त्याचे वाटोळे

उंब्रज येथील सर्व्हिस रस्त्याचे वाटोळे

Published On: Jun 29 2018 12:00AM | Last Updated: Jun 28 2018 10:21PMउंब्रज : सुरेश सूर्यवंशी

उंब्रज ता.कराड येथे सूवर्ण चौरस योजने अंतर्गत साकार झालेला महामार्ग व सर्व्हिस रस्त्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. सातारा जिल्हयात चर्चेत राहिलेले उंब्रज येथील सर्व्हिस रस्ते हे पावसाळ्यात पाण्यात असतात की रस्त्यात पाणी असते हेच कळत नाही. 

रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार नागरिकांनी अनेकवेळा  करूनही रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान सर्व्हिस रस्त्याची झालेली दूरवस्था, घाणीने तुडूंब भरलेली गटारे यांचा नागरिकांना व प्रवाशांना होणारा त्रास रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना का दिसत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. 

पुणे ते कागल दरम्यान सुवर्ण चौरस योजने अंतर्गत साकार झालेल्या महामार्ग चौपदरीकरणाची कामे  उंब्रज वगळता बहुतेक ठिकाणी दर्जेदार झाली आहेत. अनेक ठिकाणी उड्डान पूल, सबवे, फुटपाथ, गटारे आदी कामे चांगली झाल्याचे लक्षात येते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष लक्ष घातले होते. उंब्रज त्यास अपवाद असून येथील महामार्ग व सर्व्हिस रस्ते व नाल्यांचे काम दर्जाहिन झाले आहे. यापूर्वी दै.‘पुढारी’ने अनेकवेळा महामार्ग व सर्व्हिस रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवला होता. मात्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी कामाचा केवळ दिखावा केला. 

दिवसेंदिवस महामार्ग व सर्व्हिस रस्त्याची अवस्था बिकट होत असून, या बाबीकडे पाहणार कोण? दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने नाले, सर्व्हिस रस्ते यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाटण तिकाटने येथील सबवे हा वाहतुकीस खुला झाल्यापासून वादात आहे.  ठिकठिकाणी ठिगळे लावल्या प्रमाणे डांबर व खडी एकत्र करून खड्डे भरले आहेत. याच ठिकाणी गटारावरील फरशी  फुटून लहान मोठे अपघात घडले आहेत. याकडे रस्ते विकास मंडळाच्या अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सबवेच्या कामाची एकसुत्रता नसल्याने या सबवे मधून ये -जा करणारी कंटेनरसारखी मोठी वाहने अडकत आहेत. या पुलाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. 

दर्जाहिन भराव पुलाच्या कामाबरोबरच पूर्व व पश्‍चिम बाजूच्या गटारींच्या कामाचीही हिच अवस्था आहे. घाणीने व कचर्‍याने तुडूंब भरलेली गटारे तसेच ड्रेनेजचे पाणी बाहेर जाण्यासाठी गटारींना योग्य उतार नसल्यामुळे पाणी सर्व्हिस रस्त्यावर येऊन दुर्गंधी  पसरते.