Thu, Jul 18, 2019 01:05होमपेज › Satara › प्रकल्पग्रस्त जमीन विक्रीचे रॅकेट कार्यरत

प्रकल्पग्रस्त जमीन विक्रीचे रॅकेट कार्यरत

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 11:01PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

सहा दशकांहून अधिक काळ न्याय व हक्कांसाठी लढणार्‍या हजारो प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना न्याय मिळालेला नाही. मात्र, याच प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींवर डोळा ठेवून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. कोयनेपासून सातारा, ठाणे, सोलापूर, मुंबईपर्यंत एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे बोलले जात असून शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींचे सर्वच व्यवहार तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. 

कोयना विस्थापितांच्या जमिनींचा नवी मुंबई येथील कोट्यवधींचा भूखंड घोटाळा नुकताच उघडकीस आला. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनीही या सर्व व्यवहारांना स्थगिती दिली आहे. अधिक जमीन घोटाळे असल्याने हे संपूर्ण रॅकेटच उद्ध्वस्त करण्याचे आव्हानही श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिले आहे.

आघाडी सरकारच्या व युती शासनाच्या काळातही अशी अनेक प्रकरणे घडल्याने यात कोणीच साधू अथवा संत नाही, हेही चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे. मात्र, यात संबंधित रॅकेटने कोट्यवधी नव्हे, तर अब्जावधींची माया गोळा केली. ज्या भूमिपुत्रांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून हा प्रकल्प उभा केला. त्यांच्या पदरात आजवर काय पडले? हाच मात्र खरा चिंतेचा, चिंतनाचा व संशोधनाचा विषय नक्कीच बनला आहे. आजवर संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या गेलेल्या जमिनी, त्यांना द्यावयाच्या जमिनी, शासकीय नोकर्‍या, नागरी सुविधांचे प्रश्‍न, गावठाण, महसुली गावे याबाबत महत्त्वपूर्ण संकलन यादी करण्याचे काम करणेच प्रशासनाला शक्य झालेले नाही. याशिवाय, हा प्रश्‍न आजवर गांभीर्याने कोणी हाताळलाही नाही. त्यामुळे जर मूळ संकलन यादीच तयार नाही, तर मग संबंधित शेतकर्‍यांना मग त्या नवी मुबंई असो किंवा रायगड, सोलापूर जिल्ह्यातील वाटप झालेल्या जमिनी असोत, त्यांचे प्रस्ताव अथवा वाटप कसे काय झाले, याचाच प्रथमदर्शनी शोध घेणे आता अधिक महत्त्वाचे बनले आहे.  त्यामुळे सातारा जिल्ह्यापासूनच आता शोधमोहीम सुरू करणे गरजेचे आहे. आजवर कोणत्या प्रकल्पग्रस्तांना किती व कोठे जमिनी दिल्या? त्याचे शासकीय दरपत्रक, योग्य मोबदला मिळाला का? तसेच संबंधितांना केवळ कागदोपत्रीच मालक दाखवून याची परस्पर संबंधित रॅकेटने विल्हेवाट लावली का? या सर्व गोष्टींची चौकशी  व्हावी, अशी अपेक्षा प्रकल्पग्रस्त व्यक्त करत आहेत.

कथित प्रकल्पग्रस्तांना तीनदा जमिनी?
कोयना प्रकल्पग्रस्तांना 60 वर्षांनंतरही एक फूटही जमीन मिळाली नाही. मात्र,काही तथाकथित प्रकल्पग्रस्तांच्या नावे एकच नव्हे, तर तब्बल दोन ते तीन ठिकाणी जमिनी देऊन त्याची परस्पर विक्रीही झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे हे तथाकथित प्रकल्पग्रस्त नक्की कोण? त्यांना वारंवार हा मोबदला कसा व कोणी मिळवून दिला?  याचा उलगडा होणे आवश्यक आहे.