Mon, Jul 22, 2019 00:57होमपेज › Satara › वर्षभर कामे पेंडिंग, मार्च एण्डला ‘लगीनघाई’

वर्षभर कामे पेंडिंग, मार्च एण्डला ‘लगीनघाई’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मार्च एण्ड आणि दि. 11 ते 13 एप्रिलअखेर पंचायत राज समिती सातारा दौर्‍यावर येणार असल्याने चांगलीच लगीनघाई सुरू होती. परंतु, वर्षभर कामे पेंडिंग ठेवायची आणि शेवटच्या दिवशी कामे पूर्ण करण्यासाठी आटापिटा करायचा, ही झेडपीसह अन्य विभागाची जुनी खोड आहे. यामुळेच आर्थिक वर्षाअखेरीच्या शेवटच्या दिवशी विविध विभागात खर्चाचा ताळेबंद देण्याची लगबग व ठेकेदारांची बिलासाठी गर्दी झाली होती. दरम्यान, सामान्य नागरिकांना मार्च एन्डची कारण सांगून गेले अनेक दिवस हेलपाटे मारायला लावल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

शनिवारी दि. 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाची सांगता झाली. त्यामुळे सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्थांमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची एकच धावपळ सुरू होती. मार्च  एंडिगच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, महावितरण, लघु पाटबंधारे विभाग यासह सर्वच शासकीय कार्यालयाबाहेर दिवसभर अलिशान गाड्यांची वर्दळ वाढली होती.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागात विविध कामांच्या पूर्ततेसाठी धावपळ सुरू होती.सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या उत्तर व दक्षिण विभाग, लघु पाटबंधारे विभागासह अन्य विभागात  कामाची बिले काढण्यासाठी ठेकेदार ठाण मांडूनच बसल्याचे चित्र दिसून येत होते. शनिवारी सकाळपासूनच झेडपीतील काही विभागांमध्ये नागरिकांची गर्दीही झाली होती. झेडपीतील विविध विभागात कामांची बिले तपासणे, अनुदान वर्ग करणे, कामाची बिले काढणे, अखर्चीत निधी प्राधान्याने खर्च करणे, शासनाकडून आलेले अनुदान पंचायत समितीला वर्ग करणे, शासनाकडून जिल्हा परिषदेला आलेले अनुदान कोषागार कार्यालयातून काढून घेणे अशी कामे मार्च एंडींगच्या पार्श्‍वभूमीवर सुरू होती.

जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी तसेच ठेकेदारांची धावपळ सुरू होती. मार्च एण्डमुळे सर्वच कार्यालयांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते.तसेच कोट्यवधी रूपयांचा आलेला निधी विविध योजनाखाली खर्च करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ठेकेदार यांची धावपळ सुरू होती. 100 टक्के खर्च करण्यासाठी आणि जास्तीत जास्त फाईली हातावेगळ्या करण्यासाठी कार्यवाही सुरू होती. त्यातच  महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती दि. 11 ते 13 एप्रिल रोजी सातारा दौर्‍यावर येत असल्याने मार्च एंडिगबरोबरच पीआरसीची  लगीनघाई विविध विभागात सुरू असल्याचे चित्र सध्या जिल्हा परिषदेत पहावयास मिळत होते. मार्च एन्ड आणि पीआरसी यामुळे अधिकारी व कर्मचारी चांगलेच घायकुतीला आले होते. 

अनेकदा मार्च एंडिंगच्या नावाखाली अन्य कामांना फाटा दिला जातो. कार्यालयात जिल्ह्याच्या एका टोकावरून कामानिमित्त नागरिक येत असतात. मात्र, त्याला मार्च एंडिंग व पीआरसी येणार असल्याचे कारण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सांगत असतात. त्यासाठी मार्च एंडिंगच्या नावाखाली कार्यालयात  अधिकारी व कर्मचार्‍यांचे जे प्रकार सुरू असतात त्याला लगामही घालणे तितकेच गरजेचे आहे. 

झेडपीत विजेचा लपंडाव

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेत शनिवारी मार्च एंडच्या पार्श्‍वभूमीवर विविध विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची एकच धावपळ सुरू होती. मात्र, वारंवार विजपुरवठा खंडीत होत होता. त्यामुळे संगणक बंद पडत असल्याने कामात व्यत्यय येत होता. विजेच्या लपंडावामुळे कर्मचार्‍यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

 

Tags : satara, satara news, satara zp, march end, Work, 


  •