Tue, Mar 26, 2019 22:12होमपेज › Satara › आटपाडीच्या अवलियाने जपला प्राचीन कलेचा वारसा(व्हिडिओ)

आटपाडीच्या अवलियाने जपला प्राचीन कलेचा वारसा(व्हिडिओ)

Published On: Dec 05 2017 10:21AM | Last Updated: Dec 05 2017 10:09AM

बुकमार्क करा

पुढारी ऑनलाईन : सुशांत पाटील 

कल्पना आणि मार्गदर्शन यांच्या आधारावर कोण कशी कलात्मकता करेल ते सांगता येत नाही. आपल्या फावल्या वेळेत अशीच पण अत्यंत सुबक अशी काष्ठ शिल्पे आटपाडीचे काष्ठ शिल्पकार काशिनाथ मोरे यांनी साकारुन प्राचीन कलेचा वारसा जपला आहे. 

सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे राहणारे काशिनाथ मोरे हे कार पेंटरचे काम करुन आपली रोजीरोटी भागवतात. मात्र, काष्ठ शिल्पकलेत त्याचं वेगळं नाव आहे. खरं तर काष्ठशिल्पातील मूर्ती  कोरणे हे कठीण काम  आहे. मोरे फावल्या वेळेत या कलेचे काम अत्यंत मनापासून करत पूर्वापारच्या संस्कृतीचा मापदंड ठरलेली पारंपारिक काष्ठशिल्पकला जपण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या आकर्षक काष्ठशिल्पकलेतून बनविलेल्या वस्तू अत्यंत आकर्षक आहेत.

परिस्थितीमुळे काशिनाथ मोरे यांना आपले शिक्षण अर्ध्यांतूनच सोडावे लागले आणि ते कारपेंटर या व्यवसायाकडे वळले. स्वत:ला सिध्द करण्याची जिद्द मनात होतीच. त्यातूनच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आपली कला जोपासली.

मोरे हे काष्ठशिल्प निर्मीतीसाठी आटपाडी परिसरातील सहज उपलब्ध होणार्‍या वृक्षांच्या लाकडांचा उपयोग मोठ्या दूरदृष्टीने करतात. या टाकावू लाकडापासून मोरे यांनी सुबक ट्रॅक्टर, मसर्डिज कार, गौतम बुध्दांची सुबक मूर्ती, त्याचबरोबर सुंदर अशा देवदेवतांची मूर्त्या,  टुमदार घर, बैलगाडी, अशा दीर्घकाळ टिकणार्‍या नानाविध वस्तू त्यांनी आपल्या कल्पकतेतून बनविल्या आहेत. आजही या मूर्त्यांचे पंचक्रोशीतील सर्वानाच आकर्षण आहे.

लाकडाच्या ठोकळ्यापासून तीक्ष्ण हत्यारांनी अत्यंत  कोरीव काम करत मोरे यांनी देवदेवतांच्या हुबेहूब मूर्त्या बनविल्या आहेत. मूर्त्यांच्या सौंदर्यनिर्मीतीसाठी वापर करण्याची मोरे यांची काष्ठकला डोळे दीपवणारी आहे. त्यांच्या काष्ठशिल्पकलेतून बनवलेल्या अनेक देवदेवतांच्या हुबेहुब मूर्त्या प्रख्यात आहेत. अनेकजण त्यांच्या या काष्ठकलेचे कौतुक करतात. मात्र, त्यांनी बनविलेल्या या सुबक मूर्त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्याची  खंत काष्ठशिल्पकार काशिनाथ मोरे यांच्या मनात सलत आहे.