Thu, Jan 24, 2019 14:00होमपेज › Satara › टँकरच्या धडकेत पालखी सोहळ्यातील महिला ठार

टँकरच्या धडकेत पालखी सोहळ्यातील महिला ठार

Published On: Jul 16 2018 1:21AM | Last Updated: Jul 15 2018 10:38PMलोणंद : प्रतिनिधी

माऊलींची पालखी तरडगाव मुक्‍कामी असताना दर्शन घेऊन परत जाताना टँकरने धडक दिल्यामुळे सौ. कविता विशाल तोष्णिवाल (वय 42,  रा. महाबळेश्‍वर) यांना  जीव गमवावा लागला. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, महाबळेश्‍वर येथील विशाल तोष्णिवाल व त्यांचे कुटुंबीय श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते. रात्री  12.30 च्या सुमारास माऊलींचे दर्शन घेतल्यानंतर पालखी तळाजवळील लोणंद-फलटण रस्ता ओलांडण्यासाठी सौ. कविता तोष्णिवाल दुभाजकावर थांबल्या होत्या. त्याच वेळी लोणंदकडून फलटणकडे जाणार्‍या पाण्याच्या  टँकरने (एमएच 10 झेड 2708)  त्यांना जोरदार धडक दिली.  

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सौ. तोष्णिवाल यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी टँकरचालक यशवंत पावले (वय 30, रा. पावलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार दिघे करीत आहेत.दरम्यान, महाबळेश्‍वरच्या माजी नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका उज्ज्वला तोष्णिवाल व माजी नगरसेवक रतिकांत तोष्णिवाल यांच्या सौ. कविता या स्नूषा,  तर प्रसिद्ध व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते विशाल तोष्णिवाल यांच्या  त्या पत्नी होत. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुली, सासू, सासरे, दीर, भावजय असा परिवार आहे. त्या लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर महाबळेश्‍वर येथील व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर वेण्णालेक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.