Sun, Jul 21, 2019 07:48होमपेज › Satara › महिला पोलिसाचा सातार्‍यात विनयभंग

महिला पोलिसाचा सातार्‍यात विनयभंग

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:20PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणार्‍या महिला पोलिस कर्मचार्‍याचा विनयभंग झाल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप माने (रा. शनिमारुती मंदिरामागे, शनिवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, संशयित आरोपी महिला पोलिसाला फोनवरून वारंवार भेटण्यास बोलावून पुणे येथे फिरायला जाण्याची इच्छाही व्यक्‍त करत होता.

याबाबत अधिक माहिती अशी, या घटनेतील तक्रारदार महिला सातारा जिल्हा पोलिस दलात कर्तव्य बजावत आहे. तक्रारदार पोलिस महिलेची संशयित आरोपी दिलीप माने याच्याशी ओळख आहेे. ओळख झाल्यानंतर माने याने त्या महिला कर्मचार्‍याशी फोनवरून संपर्क साधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महिला पोलिसाला त्यांच्याकडे काहीतरी काम असेल, असे वाटत असल्याने     त्या फोनवर बोलत होत्या.

संशयित दिलीप माने हा मात्र फोन करुन त्या महिला कर्मचार्‍याला वारंवार भेटण्यास बोलावू लागला. भेटीवेळी माने हा ‘आपण पुण्याला जावून, त्याठिकाणी राहू, फिरुया’ अशी वक्तव्ये त्या महिला कर्मचार्‍यास उद्देशून करु लागला. या घटनेमुळे महिला पोलिसाने त्याला त्यास स्पष्ट नकार दिला. मात्र नकार देवूनही माने हा फोन करुन त्रास देवू लागला. या घटनेदरम्यानच, संशयिताने सातारा तालुका पोलीस  ठाण्यासमोर असणार्‍या एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावले. हॉटेलमध्ये बसल्यानंतर संशयिताने महिला कर्मचार्‍याशी अश्‍लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिला पोलिसाने त्याला सुनावले.

मात्र तरीही दि. 27 जुलै ते दि. 27 ऑगस्ट या काळात माने वारंवार अशाच प्रकारची कृत्ये त्या महिला कर्मचार्‍यासोबत करण्याचा प्रयत्न करु लागला. वारंवार होत असलेल्या या त्रासाला कंटाळून अखेर त्या महिला कर्मचार्‍याने मंगळवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याचा तपास महिला उपनिरीक्षक वंजारी या करत आहेत.

पोलिस लायनीत चोरट्याशी झटापट...

एकीकडे महिला पोलिसाचा विनयभंग झाला असतानाच आणखी एक धक्‍कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी मध्यरात्री उशिरा सातारा नगरपालिकेच्या समोरीलच सिटी पोलिस लायनीत ही घटना घडली आहे. महिला पोलिस एकटीच झोपी गेल्या असताना त्या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने एक जण केला. पोलिस लायनीतील निकृष्ट व जीर्ण दरवाजामुळे चोरट्याला सहज दरवाजा उघडता आला. घरामध्ये संशयास्पद हालचाली होत असल्याचे त्या महिला पोलिसाच्या लक्षात आल्यानंतर त्या जाग्या झाल्या. यावेळी चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरी करण्याच्या प्रयत्न करताच महिला पोलिसाने जिगरबाजपणे त्या चोरट्याला प्रतिकार केला. या झटापटीत महिला पोलिस किरकोळ जखमी झाली. आरडाओरडा होताच     

परिसरातील इतर पोलिस जागे झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून अज्ञात चोरट्याने तेथून पळ काढला. हा सर्व प्रकार घडला असतानाही याबाबत कुठे नोंद झालेली नाही. यामुळे याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिस लाईन अक्षरश: हादरुन गेली आहे. कारण पोलिस लाईनीतच चोरटे शिरल्याने पोलिस पत्नींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेे. पोलिस लाईनीत लाईट, रस्ते, अस्वच्छता यामुळे चोरट्यांचे फावत असल्याचे समोर आल्याने पोलिसांनी तत्काळ याबाबत उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे.