Wed, Mar 20, 2019 02:36होमपेज › Satara › दुचाकीच्या चाकात स्टोल अडकून अपघात; महिला ठार

दुचाकीच्या चाकात स्टोल अडकून अपघात; महिला ठार

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 11:13PMसातारा : प्रतिनिधी

दुचाकीवरून जात असताना गळ्यातील स्टोल चाकात अडकून झालेल्या अपघातात सौ. सारिका अभिजित देशमुख (वय 26, मूळ रा. शिवथर ता. सातारा सध्या रा. पुणे) ही महिला ठार झाली. या अपघातात सारिका यांची चार वर्षांची मुलगी अन्वी व दुचाकीस्वार चुलतभाऊ किरकोळ जखमी झाले. सातार्‍यातील जुना आरटीओ चौकात शुक्रवारी दुपारी ही हृदयद्रावक घटना घडली. 

याबाबत प्राथमिक माहिती अशी, सौ. सारिका या मुलीला घेऊन चुलत भावासोबत सातार्‍यात दवाखान्यात आल्या होत्या. दवाखान्यातील काम झाल्यानंतर हे तिघेही दुचाकीवरुन (एम एच 11 झेड 4355) परत निघाले होते. ही दुचाकी दुपारी आरटीओ चौकात आली. त्यावेळी सारिका यांच्या गळ्यातील स्टोल दुचाकीच्या चाकात अडकला. तो तसाच गुंडाळला गेल्याने दुचाकीचे चाक जॅम झाले. या घटनेने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले व अपघात झाला.

हा अपघात एवढा भीषण होता की, सौ. सारिका या जमिनीवर आदळल्या गेल्या. स्टोलचा विळखा पोटाला बसला. त्यामुळे पोटातून आतडी बाहेर आली. दुसरीकडे त्यांची मुलगी व दुचाकीस्वारही बाजूला फेकले गेलेे. ते किरकोळ जखमी झाले होते. 

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन तत्काळ जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. अपघाताची कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सारिका यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. सौ. सारिका या नातेवाईकाच्या लग्नासाठी पुणे येथून शिवथरमध्ये आल्या होत्या. दरम्यान, दुचाकीवर बसल्यानंतर महिलांच्या साडीचा पदर, ओढणी व स्टोल काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे. अशा घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. यामुळे वाहनचालक व महिलांनी याबाबत खबरदारी घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.