Thu, Apr 25, 2019 03:35



होमपेज › Satara › नायगावला महिला विद्यापीठ व्हावे

नायगावला महिला विद्यापीठ व्हावे

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:35PM

बुकमार्क करा




खंडाळा : वार्ताहर 

फुले दाम्पत्याने घालून दिलेले आदर्श आचरणात आणले पाहिजेत. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धातील सामाजिक परिस्थितीत सावित्रीबाई यांचे कार्य दीपस्तंभासारखेच आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी नायगाव येथे काढले. दरम्यान, महिलांसाठी नायगावला विद्यापीठ स्थापन करण्यासाठी विधानसभेत ठराव करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित मंत्री ना. प्रा. राम शिंदे यांना केले.

खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे भारतातील आद्य स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रिबाई फुले यांचा जयंती सोहळा व माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या प्रचार चित्ररथाचा प्रारंभ करण्यात आला. राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री ना. प्रा. राम शिंदे, पालकमंत्री ना. विजय शिवतारे, पशुसंवर्धन व मत्स्यविकास  मंत्री ना. महादेव जानकर, आ. मकरंद पाटील, आ. योगेश टिळेकर, आ. जयकुमार गोरे, आ. मनीषा चौधरी, आ. पंकज भुजबळ, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे तसेच जिल्हा परिषदेतील तसेच खंडाळ्यातील पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

ना. रामराजे निंबाळकर म्हणाले,  भिमा कोरेगाव येथे घडलेली घटना पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारी नाही.  महापुरुषांनी आपल्याला जातीयवाद शिकवला नाही. जाती-जातीतील सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. 

प्रा. राम शिंदे म्हणाले, ओबीसी मंत्रालयाची अनेक दिवसांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. त्यासाठी 2384 कोटींची घोषणाही झाली. यावर्षाच्या बजेटमध्ये या मंत्रालयास  तसेच नायगावसह खंडाळा तालुक्याला नदी पुनर्जीवन योजनेंतर्गत भरीव निधी दिला जाईल.

ना. विजय शिवतारे म्हणाले,  विधवा, परित्यक्ता यांच्यासाठी नायगाव येथे केंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

आ. मकरंद पाटील म्हणाले, नायगाव विकास आराखड्यातील मंजूर 18 कोटींपैकी 5.50 कोटी खर्च झाले. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने निधी द्यावा. या विभागात जलसंधारणासाठी सिमेंट बंधारे बांधण्यासाठी ना. शिंदे यांनी लक्ष द्यावे. 

ना. महादेव जानकर, श्‍वेता सिंघल, आ. जयकुमार गोरे, आ. योगेश टिळेकर, आ. पंकज भुजबळ, नामदेव राऊत, कल्याणराव आखाडे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. प्रारंभी स्मारकास भेट देवून मान्यवरांनी अभिवादन केले. कृषि सभापती मनोज पवार, माजी उपाध्यक्ष नितिन भरगुडे-पाटील, बापू भूजबळ, दत्तानाना ढमाळ,  शिक्षण सभापती राजेश पवार, जि. प. सदस्य उदय कबुले, जि. प. सदस्या सौ. दीपाली साळुंखे, सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदना धायगुडे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्‍विनी पवार,  चंद्रकांत यादव, शोभा जाधव, प्रांत अधिकारी आस्मिता मोरे, तहसिलदार विवेक जाधव, शिक्षण अधिकारी देविदास कुलाळ, पुनिता गुरव, गटविकास अधिकारी दिपा बापट, अलका मुळीक, सरपंच निखिल झगडे, आदेश जमदाडे  यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जि. प. उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले.