Wed, Aug 21, 2019 02:25होमपेज › Satara › महिला बचतगट, लघुउद्योगांना ‘अच्छे दिन’

महिला बचतगट, लघुउद्योगांना ‘अच्छे दिन’

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:22PMसातारा : मीना शिंदे

राज्यभर प्‍लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरु झाल्याने कापडी व कागदी पिशव्यांना मागणी वाढली आहे.  घरगुती,  बचतगट व शिवणकाम करणार्‍या लघुउद्योजिकांना कापडी पिशव्या तयार करण्यासाठी मागणी वाढली असल्याने अच्छे दिन आले आहेत. तसेच पर्यावरणाचा र्‍हास  व वाढते प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार असल्याने प्‍लास्टिक बंदीबाबत पर्यावरणप्रेमींमधून   समाधान व्यक्त होत आहे.

वापरण्यास सोपं, सहज उपलब्ध आणि स्वस्त अशा या गुणधर्मामुळे आपले जगणे प्लास्टिकमय झाले होते. पण प्लास्टिक नष्ट होत नाही, ते आपल्या पर्यावरणात टिकून राहतं आणि अंतिमत: पर्यावरणाच्या र्‍हासास कारणीभूत ठरतं. त्यामुळे त्याच्या वापरावर नियंत्रण असावं हा मुद्दा गेल्या काही वर्षांत पुढे येत होता. अखेर प्‍लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरु झाली. या  प्‍लास्टिक बंदीमुळे सर्व प्रथम कापडी व कागदी  पिशव्यांना  चांगलीच मागणी वाढली  आहे. परिणामी बचतगटांचा पिशव्या तयार करण्याचा  व्यावसाय वाढला आहे. त्यामुळे या बचतगट व महिला उद्योजिकांना अच्छे दिन आले आहेत. जिल्ह्यात महिला बचतगटाचे जाळे मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहे. महिलांच्या कला कौशल्याला वाव मिळून त्यांचा आर्थिक सबलीकरणासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडूनही बचतगटांना बळ दिले जात आहे.  यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरएसईटी केंद्र यांच्यातर्फे कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या महिला उद्योगिनींना आता प्‍लास्टिक बंदीची संधी कॅश  करुन  आपल्याकडील कापडी पिशव्यांचे उत्पादनामध्ये झपाट्याने वाढ केली आहे.

बाजारपेठेतही कापडी पिशव्यांना  मागणी वाढली आहे. 5 हजार रुपये दंड भरण्यापेक्षा 10 ते 15 रुपयांची पिशवी घेणे कधी फायद्याचेच  हा विचार करुन नागरिकही कापडी पिशव्या खरेदी करत आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात विविध प्रकारच्या कापडी पिशव्यांना मागणी वाढली आहे.  मागणीनुसार बचतगटांकडून वेगवेगळ्या आकार व डिझाईनच्या पिशव्या  बचतगटांकडून तयार करुन दिल्या जात आहेत. जिल्ह्यातील क्षेत्र माहुली, सोनगाव, खेड, जकातवाडी,  करंडी, सैदापूर, लिंब, गोवे,  साप,  लोणंद, म्हसवड, पुसेगाव, खटाव इत्यादी ठिकाणच्या बचतगटा माध्यमातून दररोज सुमारे  एक हजारपेक्षा जास्त  पिवश्या तयार केल्या जात आहेत. त्यातून महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला असल्याने बचतगटातील महिलांचे खर्‍या अर्थाने आर्थिक सबलीकरण  होण्यास मदत होणार आहे.