Thu, Mar 21, 2019 11:07होमपेज › Satara › कोंडवेतील महिला पोलिसाची आत्महत्या

कोंडवेतील महिला पोलिसाची आत्महत्या

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 11:31PMकण्हेर : वार्ताहर

मुंबईमध्ये कार्यरत असणार्‍या महिला पोलिस कर्मचारी स्वाती लखन निंबाळकर (वय 30, रा. कोंडवे, ता. सातारा) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी विष प्राशन केले होते. रविवारी सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, स्वाती यांनी दिलेल्या जबाबामध्ये या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसून स्वमर्जीने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, स्वाती निंबाळकर यांचे लखन शरद निंबाळकर यांच्यासोबत दोन वर्षांपूर्वी लग्‍न झाले होते. स्वाती मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. सुट्टीनिमित्त त्या आपल्या सासरी कोंडवे येथे आल्या होत्या. स्वाती या पोलिस दलात, तर लखन हे लष्करात केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत आहेत. लखन ज्या दिवशी सातार्‍यात आले त्याच दिवशी स्वाती यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर तिच्या सासरच्यांनी त्यांना जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात दाखल केले होते. 

स्वाती यांचे माहेर हे सातारा तालुक्यातीलच बोरखळ हे आहे. या घटनेची माहिती मिळताच माहेरच्या मंडळींनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. स्वाती यांनी कीटक मारण्याची पावडर खाल्ल्याने त्याचे विष पूर्ण शरीरात भिनले होते. उपचारादम्यानच त्यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. यादरम्यान त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नसून स्वत:च्या मर्जीने हे कृत्य केल्याचे सांगितले.

स्वातीचा तिच्या सासरच्या मंडळींकडून छळ होत होता. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. या प्रकाराने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे माहेरच्या मंडळींची समजूत घालून त्यांच्या ताब्यात स्वातीचा मृतदेह दिला. परंतु, या घटनेनंतर कोंडवेत स्वातीच्या आत्महत्येबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. स्वाती आणि लखन यांना 1 वर्षाचा मुलगाही आहे.