Fri, Aug 23, 2019 21:08होमपेज › Satara › स्त्री हीच कुटुंबाचा खरा आधार :कुलकर्णी

स्त्री हीच कुटुंबाचा खरा आधार :कुलकर्णी

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 10:11PMकराड : प्रतिनिधी

‘आपल्या मुलांसाठी गाडी, बंगला तसेच आर्थिक ठेव ठेवून संपत्ती जमा करण्यापेक्षा मुलांवर चांगले संस्कार करून सुसंस्कृत पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. आई किंवा कोणतीही स्त्री मुलांवर अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार करू शकते. त्यामुळे स्त्री हीच कुटुंबाचा गाभा असून खरा आधार आहे’, असे प्रतिपादन डॉ. सौ. वर्षा कुलकर्णी यांनी केले. 

मलकापूर (ता. कराड) येथे श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, पतसंस्था व मळाई महिला विकास मंच यांच्या संयुक्‍त विद्यमाने परिसरातील महिला व दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लब सदस्यांसाठी आयोजित महिला मेळावा, सुजाण पालकत्व व माझी सावित्री, माझा प्रद्युम्न याविषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जगन्नाथ गायकवाड होते. यावेळी दै. ‘पुढारी’चे कराड कार्यालय प्रमुख सतीश मोरे, वरिष्ठ उपसंपादक अमोल चव्हाण, जाहिरात प्रतिनिधी विकास पाटील, कस्तुरी क्लबच्या कोऑर्डीनेटर श्रुती कुलकर्णी, डॉ. सौ. स्वाती थोरात  उपस्थित होत्या.

नेहमीच दबावाखाली राहिल्याने मुलांचा विकास खुंटतो. त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी घरातील वातावरण नेहमीच मोकळे व आनंदी असले पाहिजे, असे सांगून  डॉ. वर्षा कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येकाकडून काहीतरी चूक होत असते. अशावेळी लहान मुलांकडून एखादी चूक झाल्यास त्याला लगेच शिक्षा करू नये. चुकांमधूनच मुले शिकत असतात. भविष्यातील सुजाण नागरिक निर्माण करण्यासाठी आर्थिक संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा मुलांवर चांगल्या संस्काराची ठेव ठेवा. तिच ठेव तुम्हाला व तुमच्या मुलांना भविष्यात वारंवार उपयोगी पडेल.

महिलांविषयी बोलताना डॉ. वर्षा कुलकर्णी म्हणाल्या, स्त्री हिच कुटूंबाचा गाभा असून कुटुंबाचा खरा पाया आहे. स्त्री सुशिक्षीत असेल तर कुटुंबाची आपोआप प्रगती होते. त्यामुळे स्त्री हा कुटूंबाचा खरा आधार आहे. मुलांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी आदर्श व सुजाण पालकत्वाची आवश्यकता आहे, असे सांगून त्यांनी अनेक उदाहरणांसह मार्गदर्शन करताना ‘माझी सावित्री , माझा प्रद्युम्न’ या पुस्तकाचे विवेचन केले. 

जगन्नाथ गायकवाड  म्हणाले, मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी महिलांनी सदैव आपल्या विचारांचे स्पंदन सकारात्मक ठेवावे.

डॉ. सौ. स्वाती थोरात म्हणाल्या, मळाई महिला विकास मंच हे गेली आठ वर्षांपासून महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करत असून हा 33 वा महिला मेळावा आहे.  मुलांची उत्तम जडणघडण करत असताना पालकांना मुलांसाठी जास्तीतजास्त वेळ द्यावा लागेल. 

यावेळी मंगळागौरी खेळ व कोपर्डी हत्याकांड-निषेधात्मक नृत्याविष्कार सादर करण्यात आला. सौ.  लोकरे यांनी  सिरॅमिक पॉट पेंटिंगचे प्रात्यक्षिक दाखवले. सुत्रसंचालन सौ. खंडागळे यांनी केले. सौ. सुलोचना भिसे यांनी आभार मानले.