Wed, Jul 24, 2019 08:18होमपेज › Satara › गडकिल्ले देताहेत छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष

गडकिल्ले देताहेत छत्रपती शिवरायांच्या शौर्याची साक्ष

Published On: Feb 19 2018 1:20AM | Last Updated: Feb 18 2018 9:05PMसातारा : दीपक देशमुख

गडकोट किल्ले हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदारच आहेत. त्यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेले अनेक किल्ले सातारा जिल्ह्यालाही लाभले आहेत. तथापि आज त्यापैकी अनेक किल्ले दुर्लक्षित झाले आहेत. मराठ्यांच्या असिम शौर्याचे प्रतिक असलेल्या या गडकिल्ल्यांचे जतन होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरातत्त्व खात्याने लक्ष घालून ठोस पावले उचलण्याची गरज आहे. तसेच गडांना भेट देणार्‍या शिवप्रेमी व पर्यटकांनीही योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे. 

किल्ल्यांचा अभेद्यपणा, शत्रूवर नजर ठेवण्याचे मोक्याचे स्थान, शत्रुला बराच काळ झुंजवत ठेवण्याचे त्यांचे सामर्थ्य, त्यांचा बेलागपणा, असे सर्व गुण हेरून छत्रपती शिवरायांनी अनेक सह्याद्रीच्या कडेकपारीतील किल्ल्यांचा चांगला उपयोग करून घेतला. अनेक किल्ले शत्रुवर हल्ला करून ताब्यात घेतले तर किल्ल्यांची डागडुजी केली. तसेच अनेक किल्ल्यांची उभारणी केली. 

भोरप्याच्या डोंगरावर छत्रपती शिवरायांनी बांधून घेतलेला बुलंद प्रतापगड हे याचेच उदाहाण. सातारा जिल्ह्यातील जवळपास 25 किल्ले मराठ्यांच्या इतिहासाचे साक्षीदार असून यातील काही किल्ले संरक्षित आहेत तर काही असंरक्षित असल्याची नोंद पुरातत्त्व विभागात आहे. सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब असून या ऐतिहासिक स्मारकांचे संर्वधन व जतन करण्यासाठी पुरातत्त्व खात्याबरोबरच शिवप्रेमी नागरिकांनही जागरूक राहण्याची गरज आहे.