होमपेज › Satara › गणपत वाण्याचे स्मारक उद्घाटनाविना

गणपत वाण्याचे स्मारक उद्घाटनाविना

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:29PMसातारा : प्रविण शिंगटे

गणपत वाणी बिडी पिताना
चावायचा नुसताच काडी ।
म्हणायचा अन् मनाशीच की
या जागेवर बांधिन मी माडी ॥ 
असे स्फुरणकाव्य लिहिणार्‍या कविवर्य  बा.सी. मर्ढेकर यांचे मर्ढे, ता. सातारा येथे शासनामार्फत उभारलेले स्मारक गेल्या 4 वर्षांपासून अद्यापही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. स्मारक पूर्णत्वाला गेले असले तरी बा. सी. मर्ढेकर यांचा पुतळा, काव्यशिल्प यासह अन्य अंतर्गत कामे रखडली असून निधीच उपलब्ध नसल्यामुळे ही कामे मार्गी लागणार का? असा प्रश्‍न नागरिकांसह साहित्यिकांना पडला आहे.

‘पिंपात मेले ओल्या उंदीर’ या कवितेतून  जीवनाचे विदारक सत्य मांडून बा.सी. मर्ढेकर यांनी साहित्य क्षेत्रात खळबळ उडवून दिली. आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि युगप्रवर्तक अशी ओळखही त्यांना मिळाली. अशा या कवीची मृत्यूनंतरही उपेक्षाच सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सातारा तालुक्यातील मर्ढे या मर्ढेकराच्या मूळ गावी बांधण्यात आलेल्या  स्मारकाच्या उद्घाटनासाठी राज्यकर्त्यांना अद्यापही सवड मिळालेली नाही.

विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 1963 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातार्‍याला झाले. या संमेलनात सातारा जिल्ह्यातील मर्ढे या बा.सी. मर्ढेकरांच्या मूळगावी  त्यांचे स्मारक व्हावे, अशी भावना सारस्वतांनी व्यक्त केली. सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अभयसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, माजी आमदार कांताताई नलावडे यांनी शासनस्तरावर आवाज उठवला. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मारकासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून दिला. स्मारकांच्या कामासाठी शासनाने 48 लाख 76 हजार  84 रुपयांचा निधी दिल्यामुळे  काम मार्गी लागले. मात्र, मर्ढेकरांचे स्मारक आता उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. 1963 साली पुढे आलेला हा विषय 55 वर्षांनंतरही मार्गी न लागल्यामुळे मर्ढे ग्रामस्थांसह  साहित्यिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. सुमारे 55 वर्षांत एक विषय मार्गी लागत नाही ही शोकांतिका आहे.
किती तरी दिवसात 
नाही चांदण्यात गेला ।
किती तरी दिवसात 
नाही नदीत डुंबलो ॥
असे म्हणणार्‍या या प्रतिभावंत कवीच्या वाट्याला त्याच्या मायभूमीत उपेक्षेचं जीणं यावं यासारखं दुर्देवं नाही. कितीतरी दिवसात नाही  कुणी फिरकलं अशीच स्थिती स्मारकाच्या उद्घाटनाबाबत होवून बसली आहे.

स्मारक दुमजली असून त्यामध्ये तळमजल्यावर मर्ढेकरांचा पुतळा,  सभागृह, कार्यालय, ग्रंथालय, षटकोनी आकाराचे शिल्प, तर पहिल्या मजल्यावर येणार्‍या साहित्यिक व पर्यटकांसाठी दोन खोल्या भांडारगृह, अभ्यासिका यांचा समावेश आहे. कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या जीवनातील नोंदी, घटना, छायाचित्रे, विविध पुस्तके, तैलचित्र, भिंतीवर मर्ढेकर यांच्या गाजलेल्या कविता काव्यशिल्पावर कोरण्यात येणार असल्याचे आराखड्यात नमूद करण्यात आले होते. त्याचबरोबर संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, बागबगीचा विद्युतीकरण या कामापैकी काही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, बा. सी. मर्ढेकरांचा पुतळा, काव्यशिल्प व अन्य कामे निधीअभावी अजूनही रखडलेली आहेत.