Thu, Apr 18, 2019 16:34होमपेज › Satara › ‘एस’ वळणाचे महापाप ‘एनएचएआय’चेच

‘एस’ वळणाचे महापाप ‘एनएचएआय’चेच

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 14 2018 10:57PMसातारा : प्रतिनिधी

चौपदरीकरणाच्या कामात प्रचंड चुका झाल्या. त्यात दुरुस्ती न करताच सहापदरीकरणाचे काम रेटून सुरु झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तसेच महामार्गाचे डिझाईन बनवणार्‍या कंपनीत त्यावेळी मोठे ‘अर्थकारण’ घडले. चुकीचे डिझाईन स्वीकारण्याचे महापाप त्यावेळी एनएचएआयने केले. त्यामुळे खांबाटकीच्या घाटात झालेल्या अपघातात सुमारे 75 जण दगावले. मात्र, सगळी सेटिंग वरुनच करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्याच्या मध्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 4  चे काम रिलायन्स इन्फा तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने केले आहे. या कंपन्यांनी काम करत असताना पुन्हा सब ठेकेदार नेमून केवळ कमिशनचाच धंदा केला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे  संबंधित ठेकेदारांनी वाट्टोळे केले. दुसरीकडे टोल आकारणी मात्र भरसाठ केली जात होती. दुरुस्तीच्या नावाने शिमगा सुरु असताना महामार्गाच्या डिझाईनचा मुद्दा बर्‍याचदा उपस्थित झाला. कोणतेही विकासकाम करत असताना त्याचे रेखांकन आणि अंदाजपत्रक असणे आवश्यक असते.  तसे डिझाईन राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी तयार करण्यात आले. मात्र, हे डिझाईन जाहीर न करताच चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन कार्यक्रम गुपचूप उरकण्यात आला. त्यानंतर चौपदरीकरणाचे काम सुरु असताना स्थानिक गावांची मागणी लक्षात घेतली नाही. आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नाल्यांवरील पूल, बॅरिगेट्स, रेलिंग, रुंदीकरण याबाबत स्थानिक नागरिक व नेते तसेच संबंधित आमदार सातत्याने मागणी करत होते.

मात्र, राष्ट्रीय महामार्गाचे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी केवळ आश्‍वासन देवून वेळ मारुन न्यायचे. प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गाच्या बनवलेल्या चुकीच्या डिझाईनचे दुष्पपरिणाम महामार्गाचे काम सुरु असतानाच दिसू लागले. उड्डाणपूल नसल्याने नागरी वस्तीजवळ अपघातांचे प्रमाण वाढले. पारगाव  बसथांब्यावर सात-आठ प्रवाशांना कंटेनरने चिरडले. मोर्‍या न काढल्याने शेतात पाणी घुसून शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान झाले. चुकीच्या ठिकाणी दुभाजक बनवल्याने अनेकांच्या शेतातील मार्ग बंद झाला. मनातील खदखद लोक रस्त्यावर उतरुन व्यक्‍त करु  लागले. मात्र, सगळ्यांची मिटवामिटवी केली जात असल्याने ही जनआंदोलने मोडून काढण्यात आली. या आंदोलनांची काही नेत्यांनी सोयीने दखल घेतली. त्या बैठकांमध्ये उपाययोजना करण्याची आश्‍वासने महामार्ग प्राधिकरणाने दिली. मात्र, कारवाई कुणावर करायची? हा प्रश्‍नच होता. ठेकेदार रस्त्यावर काम करत असतानाही अपघात का घडत होते? हे माहीत असूनही महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी संबंधित डिझाईन बनवणार्‍या कंपनीला पाठीशी घातले. पुण्यातील त्या कंपनीला डिझाईनसाठी कोट्यवधी देण्यात आले. यामध्ये मोठी टक्केवारी काढल्याची चर्चा त्यावेळी झाली आणि आताही असेच बोलले जात आहे. ही सर्व सेटिंग वरपर्यंत आहेत. कमिशन घेणार्‍यांत अनेकांची नावे येत असून काही नेतेमंडळींमुळे हे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप होत आहे.

त्यातील नेमका प्रकार उघडकीस येवू दिला जात नाही. त्यावर फारशी चर्चा केली जात नाही.  चुकीच्या डिझाईनमुळे महामार्ग धोकादायक बनला आहेच मात्र, त्यानंतर दुरुस्तीसाठी अब्जावधींचा भुर्दंड सरकारला बसला. पर्यायाने हा खर्च सर्वसामान्यांना टोलमधूनच सोसावा लागत आहे. याचीही जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांवर निश्‍चित करुन त्यांच्याकडून झालेले नुकसान वसूल करावे, अशी मागणी जिल्हावासीयांतून होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामात झालेल्या गैरप्रकारावर ‘कॅग’ने ताशेरे ओढले आहेत. मात्र, त्याची दखल घेवून उपाययोजना करण्यात केंद्र सरकारलाही स्वारस्य नाही. महामार्गाची कामे पाहिली तर हाच काय तुमचा पारदर्शक कारभार? असा संतप्‍त सवाल जिल्हावासीयांतून केला जात आहे.

Tags  : Satara, Without, doing,  amendment,  work, started, six, step, process, started