Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Satara › जादूटोणा कायदा प्रबोधनाशिवाय अपुरा : श्याम मानव 

जादूटोणा कायदा प्रबोधनाशिवाय अपुरा : श्याम मानव 

Published On: Apr 29 2018 2:07AM | Last Updated: Apr 28 2018 8:50PMसातारा : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश  यांची हत्या करणारे मारेकरी  एकच असून ते सहजासहजी सापडणे अशक्य असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, जादूटोणा विरोधी कायदा सन 2013 मध्ये संमत झाला असला तरी कायदा प्रबोधनाशिवाय अपुरा आहे त्यासाठी लोकांमध्ये व्यापक प्रबोधन होणे गरजेचे आहे.

प्रा. श्याम मानव म्हणाले, आसाराम बापूपासून ते रामरहीमपर्यंत अनेक उदाहरणे डोळ्यासमोर असून बाबा बुवा धर्माच्या व देवाच्या नावाखाली अमानूष पध्दतीने स्त्रीयांचे शोषण करत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीने महाराष्ट्रभर ‘वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया’ हा विषय घेवून महाराष्ट्रभर जनजागृती शिबीरे घेतली जात आहेत. जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये प्रचंड गैरसमज आहेत. त्यासाठी नागरिकांसह पोलिसांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्यासाठी प्रबोधनाची नितांत गरज आहे.

या कायद्याच्या जनजागृतीसाठी  समिती गठीत केली त्यासाठी मागील शासनाने सहकार्य केले. या कायद्याच्या जनजागृतीसाठी शासनाने साडेचौदा कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातील 1 कोटीमधून पहिल्या टप्प्यात सामाजिक न्याय विभागामार्फत 35 जिल्ह्यात जाहीर सभा घेण्यात आल्या. वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणाविरोधी कायद्याबाबत  राज्यातील 400 हून अधिक शाळांमध्ये मार्गदर्शन शिबीरे घेण्यात आली. राज्यातील 35 जिल्ह्यात सुमारे 40 प्रशिक्षण शिबीरे पोलिसांना देण्यात आली, असेही ते म्हणाले.

या कायद्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेतली मात्र अजूनही या सरकारने या कायद्याबाबत काहीच केलं नाही. मात्र सरकारला 1 वर्ष उरलेले आहे याबाबत कार्यवाही करू, असे मला सांगत आहेत.मात्र मागील दोन निवडणुका झाल्या त्यावेळी  जादूटोणा  विरोधी कायद्याचा मुद्दा समोर आला होता, असेही ते  म्हणाले. अंधश्रध्दा निर्मूलन समितीमार्फत राज्यभर आपण स्वत:च पोलिस शिबीरे व प्रशिक्षण घेत आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनासंदर्भात बोलताना प्रा. मानव म्हणाले, दाभोलकर यांच्या खुनाचा  तपास जसा सिबीआयकडे गेला तसे याबाबत  काहीही माहिती मिळत नाही. सिबीआयचे अधिकारीही संपर्कात नाहीत मात्र, गोविंदराव पानसरे यांच्या  तपासाची माहिती पोलिस अधिकार्‍यांकडून मिळत असते. मध्यप्रदेशामध्ये सहा संताना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला आहे? या प्रश्‍नावर बोलताना प्रा. मानव म्हणाले, संतांना राज्यमंत्र्याचा दर्जा देणे  आयोग्य आहे. मुळात ही माणसे भोंदू आहेत. यावेळी सुरेश झुरमुरे, जिल्हाध्यक्ष  प्रा. विलास खंडाईत, खरात उपस्थित होते.

दरम्यान, रविवार दि. 29 रोजी सकाळी 10 ते 6 यावेळेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेजमध्ये प्रा. श्याम मानव यांच्या उपस्थितीत एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असून शिबीराचे उदघाटन पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते होणार आहे.