Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Satara › औंध विभागात वायरमनची पदे रिक्‍त

औंध विभागात वायरमनची पदे रिक्‍त

Published On: Dec 16 2017 1:49AM | Last Updated: Dec 15 2017 10:42PM

बुकमार्क करा

औंध  : वार्ताहर

औंध वीज वितरण कार्यालयांतर्गत येणार्‍या तेरा गावांपैकी सात गावांमधील वायरमनची पदे रिक्त असून यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय होत असून ही पदे शासनाने तातडीने भरावीत, अशी मागणी शेतकरी ग्राहकांतून होत आहे. 

वीज वितरण विभागातील अनेक पदे  रिक्त असल्याने शेतकरी, ग्रामस्थांना स्वत:चा जीव धोक्यात घालून अनेक ठिकाणी शेतातील, घरातील वीज दुरूस्तीची कामे स्वत:चा जीव धोक्यात घालून करावी लागत आहेत. 

त्यामुळे नूतन पदभार स्वीकारलेले अधिकारी तरी कामात सूसुत्रता आणणार की पहिले पाढे पंचावन्न सुरूच राहणार हा प्रश्‍न यानिमित्ताने शेतकरी, ग्रामस्थ वर्गातून उपस्थित केला जात आहे .
औंध वीज वितरण कार्यालयांतर्गत औंधसह कोकराळे, अंभेरी, भोसरे,जायगाव, खबालवाडी, त्रिमली, गणेशवाडी, करांडेवाडी, येळीव, गोपूज, नांदोशी,लांडेवाडी ही तेरा गावे येतात. पण, मागील काही वर्षांमध्ये अकरा वायरमन पदांपैकी  जवळजवळ सात वायरमन पदे रिक्त झाली आहेत.

 त्यामुळे गोपूज, अंभेरी, कोकराळे, येळीव, गणेशवाडी, खबालवाडी, करांडेवाडी या गावांमधील वायरमनची पदे रिक्त आहेत. सध्या औंध येथील तीन वायरमनवरच सर्व कारभार सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला, शेतातील वीज कनेक्शनचा घोटाळा  झाला तर शेतकरी, नागरिकांना तिष्टत रहावे लागत आहे. ज्यावेळी वायरमन, वीजसेवक येईल त्यावेळीच ही कामे होत आहेत. यामुळे तीन वायरमनवरच कामाचा ताण येत असून वयोमानानुसार यातील काही वायरमनना पोलवरील दुरुस्तीचे काम जमत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक, युवक, शेतकर्‍यांच्या मदतीने ही कामे करावी लागत आहेत.

सध्या औंध भागातील तेरा गावांमध्ये सुमारे सहा हजार घरगुती वीज कनेक्शन आहेत तसेच शेती पंप,औद्योगिक व लघु उद्योगाची सुमारे दिड हजार वीज कनेक्शन आहेत. त्यामुळे काम करणारे कर्मचारी कमी व कामाचा ताण अधिक अशी स्थिती निर्माण झाली आहे.