Fri, Jun 05, 2020 12:20होमपेज › Satara › स्थानिकांच्या रोजगाराबरोबर ग्रामपंचायत करांचे भवितव्य अंधारात

पवनचक्क्या कंपन्यांनी गाशा गुंडाळला

Published On: Jan 31 2019 1:33AM | Last Updated: Jan 30 2019 11:12PM
पाटण : गणेशचंद्र पिसाळ

पवनचक्क्यांमुळे औद्योगिक क्रांती होवून अपारंपरिक ऊर्जा श्रेत्रात उल्लेखनीय काम झाले. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार व व्यवसाय निर्मितीही झाली. स्थानिक ग्रामपंचायतींना कराच्या माध्यमातून कोट्यवधीचे उत्पन्न सुरू झाल्याने विकासालाही चालना मिळाली. मात्र आता हा उद्योगच अडचणीत आल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या प्रत्येक घटकालादेखील याची झळ सोसावी लागणार आहे.

शेतीमधून झालेले नुकसान व कर्जबाजारी पणाला  कंटाळून आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. वाढणारी बेरोजगारी व त्यातून उघड्यावर येणारे संसार आत्महत्येकडे वळू नयेत यासाठी शासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. 

यापूर्वी अनेक वर्षे पवनचक्क्यांच्या माध्यमातून निर्माण होणारी वीज चांगल्या दरात घ्यायला व वितरीत करायला शासन तथा वीज कंपनीला परवडत होते. मात्र गेल्या काही वर्षांत ग्राहकांसाठी कमालीची दरवाढ आणि खरेदी करतानाच्या दरात कमी दर देवूनही संबंधित कंपन्यांना त्या दरातील पैसा द्यायला होणारा विलंब  निश्‍चितच संभ्रम निर्माण करणारा आहे. अनेक कंपन्यांची थकीत बाकी ठेवून त्यावर व्याजाचे गाजर दाखविण्यात आले परंतु त्यातही संबंधितांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. स्वाभाविकच पवनचक्क्यांची देखभाल दुरूस्ती ,कामगारांचे पगार होवू शकले नाहीत. यात आधी नोकर कपात तर नंतर पवनचक्क्या बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही.  याबाबत वीज नियामक आयोगाकडे तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने कंपन्यांनी आपले टॉवर उतरून ते परराज्यात नेवून तेथे हा प्रकल्प साकारण्यासाठी सुरूवातही केली आहे .

या प्रकल्पामुळे निश्‍चितच स्थानिक पातळीवर नंदनवन झाले होते. हजारोंच्या संख्येने यातून रोजगार व व्यवसाय निर्मिती झाली होती. आता पवनचक्क्याच रहाणार नसल्याने आपोआपच यातील कामगार बेरोजगार होणार आहेत. बहुतांशी कामगारांची वयोमर्यादा लक्षात घेता त्यांना आता इतरत्र कोठेही काम मिळणार नाही. तिच अवस्था या प्रकल्पावर अवलंबून असणार्‍या व्यावसायिकांचीही आहे. अनेकांनी यावर आधारित लाखोंची कर्जे घेवून उदरनिर्वाहाचा प्रयत्न केला होता मात्र या उद्योगावरही कुर्‍हाड कोसळणार आहे. राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार करून योग्य ती पावले उचलली पाहिजेत. जर अन्य राज्यांना हा उद्योग परवडतो तर मग येथे नक्की काय अडचणी याचाही फेरविचार करण्याची गरज आहे.