Tue, May 26, 2020 18:05होमपेज › Satara › पवनचक्क्या उद्योगाला अखेरची घरघर 

पवनचक्क्या उद्योगाला अखेरची घरघर 

Published On: Jan 30 2019 1:34AM | Last Updated: Jan 29 2019 10:58PM
पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

डोंगरपठारावर जिथ कुसळही पिकत न्हवती तिथ फुकटच्या वार्‍याला कामाला लावत पवनचक्क्या उद्योगाने औद्योगिक क्रांती केली. दुर्दैवाने शासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसल्याने अब्जावधींची उलाढाल असलेला हा उद्योग आता अडचणीत आल्याने काही कंपन्यांनी आपले टॉवर परराज्यात न्यायला सुरूवात केली आहे. तर काहींना देखभाल व दुरुस्तीचा खर्चदेखील परवडत नसल्याने त्या सडत व गंजत पडल्या आहेत. 

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतातील पवनचक्क्यांची ही अखेरची ‘घरघर ’ ही पाटण तालुक्यातील हजारो रोजगार व्यवसायासह सार्वत्रिक तोट्याची ठरणार असल्याने यासाठी तात्काळ उपाययोजना झाल्या नाहीत तर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. पाटण तालुका हा मुळातच डोंगराळ व भौगोलिकदृष्ट्या अडचणीचा  आहे. भूकंप, अतिवृष्टी, महापूर यामुळे येथे औद्योगिक विकास म्हणजे दिवास्वप्नच. परंतु माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या सहकार्याने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी आपल्या दूरदृष्टीतून याच डोंगरपठारांवर पवनचक्क्या प्रकल्प आणला.  आशिया खंडातील पवनऊर्जेसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून जगमान्यता मिळवत येथे अब्जावधींची गुंतवणूक होवून हजारो पवनचक्क्या उभ्या राहिल्या. राज्याची शेकडो मेगावॅट विजेची तूट यातून भरून निघाली आणि घरगुती, व्यावसायिक व उद्योग श्रेत्राला यातून वीज मिळाली. 

गेली काही वर्षे प्रगती पथावर असलेल्या या प्रकल्पाला अलीकडच्या काही वर्षांत शासकीय धोरणामुळे  घरघर लागगली. पवनचक्क्यांमध्ये तयार होणारी वीज शासन तथा वीज कंपनीला विकली जायची. पूर्वी शासनाकडून प्रती युनिट मिळणार्‍या दरात गेल्या काही वर्षांत वाढ केली गेली नाही. एकीकडे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांच्या दरात कमालीची वाढ झाली. त्याचवेळी दुसरीकडे पवनचक्क्या कंपन्यांना देण्यात येणार्‍या दरात कपात करत हा दर पावपट कमी झाल्याने किमान खर्चही यातून निघत नसल्याच्या तक्रारी झाल्या. गेल्या काही वर्षात हे पैसे देखील वेळेत देण्यात आले नाहीत. त्यामुळे  कोट्यवधी रूपये थकीत राहिले. संबंधितांनी याबाबत सातत्याने मागणी करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. याच दरम्यान या थकीत रक्कमा व्याजासह देण्याचेही सांगण्यात आले मात्र त्यालाही हरताळ फासण्यात आला. काही कंपन्यांनी व्याजाचा नाद सोडून मुळ रक्कमा घेतल्या.