Sat, Mar 23, 2019 12:02होमपेज › Satara › पवनचक्क्या कंपन्या, दलाल व शेतकरी वॉर पुन्हा भडकणार

पवनचक्क्या कंपन्या, दलाल व शेतकरी वॉर पुन्हा भडकणार

Published On: Apr 07 2018 1:37AM | Last Updated: Apr 06 2018 7:51PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

गेली काही महिन्यांपासून शांत असलेल्या पाटण तालुक्यातील डोंगरपठारांवर पुन्हा पवनचक्क्या कंपन्यांची पाती येवू लागल्याने स्थानिक शेतकरी, कंपन्यांचे दलाल व प्रतिनिधी यांच्यातील जमिनींच्या मोबदल्यावरून पुन्हा गाड्या अडविण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. याप्रकरणी आता पोलिसात संबंधितांविरुद्ध खंडणीचे गुन्हेही तातडीने दाखल करण्यात आले आहेत. वास्तविक तालुक्यात इतरत्र मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावली असताना त्याकडे लक्ष द्यायला या यंत्रणांकडे वेळ नाही. 

मात्र परराज्यातील अशा कंपन्यांना संरक्षण तथा राजाश्रय देवून स्थानिकांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यापाठीमागचे नक्की गौडबंगाल काय ? याचा आता वरिष्ठांनीच तपास करावा अशी मागणी मोरणा विभागातील भरडलेल्या जमीनमालकांमधून होत आहे.  पवनचक्क्या कंपन्या, त्यांचे दलाल, यात भरडलेले शेतकरी व दोन्ही बाजूंनी मलई खाणारे कॉर्नरभाई हे निदान पाटण तालुक्यासाठी तरी नवीन नाही. यात केवळ कंपन्यांच दोषी आहेत असे नाही. काहीवेळा शेतकर्‍यांनी एकाच जमीनीचा दोन तीन वेळा मोबदला घेऊन पुन्हा त्याच जमिनींवर न्यायालयात खटले दाखल केले, तर काहीवेळा मधल्या दलालांनी कंपनी व शेतकरी या दोघांनाही दोन्ही बाजूंनी धुतले. काही कंपन्या व दलालांनी शेतकर्यांना काही एकराचे पैसे देऊन अक्षरशः संपूर्ण सर्व्हे नंबरमधील शेकडो एकर जमीन घशात घातली. महसूल, दुय्यम निबंधक, पोलीस व राज्यकर्त्यांसह स्थानिक पुढारी तथा गावगुंडांना हाताशी धरून हे उद्योग करण्यात आले. तर ज्यांनी कंपन्यांच्या दलालीमधुन कोट्यवधीची माया मिळवली त्यांनीच पुन्हा दळणवळणाच्या मुख्य वाटेवरील महत्वपूर्ण कॉर्नर विकत घेऊन काही गुठ्यांची तोड काही कोटीत घेऊन कंपन्यांची वाहने अडवून त्यांना घरचा आहेर दिला. 

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून या सर्व बाबी शांत होत्या. मात्र आता पुन्हा मोरणा खोर्यात रतकगिरी विंड मिल या कंपनीच्या पवनचक्क्यांची पाती निघाल्याने ही वाहने स्थानिक शेतकर्‍यांनी अडवली. याबाबत तक्रार होताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, कंपन्याना संरक्षण तर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून येथे अनेक शेतकर्‍यांवर थेट खंडणीचे गुन्हे दाखल होवून काहींना तात्काळ अटक करण्यात आली. वास्तविक यात सगळेच दोषी अथवा सगळेच निर्दोष असतील असे नाही. मात्र जी तत्परता येथे कंपन्यांच्या बाबतीत दाखवली जाते तीच तत्परता मग याच विभागातील कंपन्यांकडून फसवणूक झालेल्या तक्रारदार शेतकर्‍यांबाबतही का होत नाही हाही संशय व संशोधनाचा विषय बनला आहे. 

Tags : Satara, Wind turbine, companies, brokers, farmers, fight, again