Fri, Jul 19, 2019 05:03होमपेज › Satara › उपद्रवी ठेकेदारांवर कारवाई होणार का?

उपद्रवी ठेकेदारांवर कारवाई होणार का?

Published On: Aug 25 2018 1:17AM | Last Updated: Aug 24 2018 10:13PMकराड : अशोक मोहने 

ठेकेदारांशिवाय वीज वितरणचे पानही हालत नाही ही वस्तुस्थिती आहे.  याचाच गैरफायदा ठेकेदार लॉबींनी घेतला असून अधिकार्‍यांवरच त्यांची शिरजोरी सुरू आहे. याला वीज वितरण मधील काही मंडळींची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ असल्याने अशा झारीतील शुक्राचार्यांचा शोध वरिष्ठांनी घेण्याची गरज आहे. शिवाय उपद्रवी ठेकेदारांवरही कारवाईचा दंडुका उगारण्याची गरज आहे.  

वीज वितरण कंपनीच्या ओगलेवाडीसह कराड शहर, विजयनगर, वारुंजी, वडगाव हवेली, उंब्रज, मलकापूर, मल्हारपेठ, पाटण आदी सर्वच कार्यालयात ठेकेदारांची लॉबी कार्यरत आहे. कोणतेही काम ठेकेदारांशिवाय करता येेणे शक्य नसल्याने ठेकेदारांचे लाड पुरविले जात आहेत. याचा पुरेपूर फायदा उठवत ठेकेदार सक्रीय झाले आहेत. कोणी अधिकार्‍यांवर ‘वजन’ ठेवून तर कोणी राजकीय वजन वापरून वीज वितरणच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. हे प्रकार इतके वाढले आहेत की ते अधिकार्‍यांना डोईजड झाले आहेत. त्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे काही अधिकारी अक्षरशः त्रस्त आहेत.

अपुर्‍या कर्मचारी संख्येमुळे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत नाही. गावात मुक्कामी वायरमन नसतात. वीज पुरवठा खंडीत झाल्यास ग्रामस्थ स्वतःचा जीव  धोक्यात घालून बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न करतात. जागोजागीचे फ्यूज बॉक्स सताड उघडे असतात. त्यांची दुरूस्तीच नाही त्यामुळे लोकांना जीव गमवावे लागतात. वडगाव हवेली येथे तिघांना जीव गमवावा लागला आहे. 

पाटण आणि मल्हारपेठ विभागात अधिकारी व ठेकेदारांचे अंतर्गत साटेलोटे नेहमीच वीज ग्राहकांसह अगदी कंपनीच्याही मुळावर उठल्याचे पहायला मिळते. कंपनीला चुना लावण्याचे प्रकार घडत असले तरी त्याकडे सोयीस्कर डोळेझाक होत असल्याच्या तक्रारी आहेत.  काही ठिकाणी गरज असताना कामे होत नाहीत. मात्र काही ठिकाणी गरज नसतानाही कामे केली जातात. त्यामुळे मग अशी कामे नक्की कोणाच्या सोयीसाठी असा प्रश्‍न उपस्थित होतो. मुळातच पाटण तालुक्यातील नैसर्गिक व भौगोलिक परिस्थिती सर्वज्ञात आहेच. मात्र यावर मात करण्याऐवजी याच संधीचा गैरफायदा उठवत वीज कंपनीचे ठेकेदार व काही अधिकारी, कर्मचारी यांनी संगनमताने काही ठिकाणी कामे दाखवून परस्पर मलिदा लाटल्याच्या चर्चा आहेत. कित्येकदा मुळ कामासाठी प्रत्यक्षात आलेला खर्च व काढण्यात आलेली बिले यात मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे बोलले जाते.