Thu, Jul 18, 2019 06:05होमपेज › Satara › पाटणचा जुगार, मटका बंद होणार का?

पाटणचा जुगार, मटका बंद होणार का?

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 8:48PM

बुकमार्क करा

पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

पाटण शहर व परिसरात सध्या पुन्हा एकदा मटका, जुगार आदी अवैध धंद्यानी मोठ्या प्रमाणावर डोके वर काढले आहे. विंचवाच्या पाठीवरच्या बिर्‍हाडाप्रमाणे या ठिकाणावरून त्या ठिकाणावर असा जुगार अड्ड्यांचा बदलत्या भूकंपाच्या केंद्रबिंदूसारखा प्रवास सुरूच आहे. यात अनेकांचे संसार उध्वस्त होत असून बेरोजगार सुशिक्षित तरुणाई देशोधडीला लागत आहे. मात्र वर्दीतल्या दर्दींचा आर्थिक राजाश्रय याचे मूळ असल्याचा सामाजिक आरोप होत आहे. त्यामुळे ‘ब्रम्हदेव आला तरी पाटणचे बेकायदेशीर धंदे बंद करू शकत नाही. असा उन्माद या धंदेवाल्यांकडून व्यक्त होत आहेत त्यामुळे आता हे आव्हान तगडे जिल्हा पोलिसप्रमुख कसे मोडीत काढणार ? याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

सध्या व्यापारी बाजारपेठांमध्ये सार्वत्रिक मंदी आहे. मात्र त्याचवेळेस दुसरीकडे पाटण व परिसरात बेकायदेशीर धंदे तेजीत सुरू असल्याचे चित्र आहे . मध्यंतरी न्यायालयाच्या आदेशानुसार देशी, विदेशी दारू दुकाने बंद होती. यापैकी पाटण शहरात नगरपंचायत असल्याने याठिकाणची दुकाने पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे शहरात फोफावलेल्या बेकायदेशीर दारू धंद्यांना आपोआपच आळा बसला मात्र ग्रामपंचायत हद्दीत असणारी दारू दुकाने अद्यापही कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने ग्रामीण विभागात अजुनही मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी सुरूच आहे.

एका बाजूला हा बेकायदेशीर दारू उद्योग बोकाळला असतानाच दुसरीकडे सध्या जुगार आणि मटक्याने परिसराला अक्षरशः घेरले आहे. शहरात ठिकठिकाणी मटका घेतला जात आहे. तर दुसरीकडे आजुबाजुला जुगार अड्यांचा सुळसुळाट आहे. याठिकाणी जुगार खेळणार्‍यांसाठी नानाविध आकर्षणे ठेवण्यात आली आहेत. तर स्थानिक नव्हे पण बाहेरच्या पोलिसांच्या अचानक छापा टाकण्याचा भितीने  विशिष्ट मंडळी रस्त्यांवर पहारेकरी म्हणून तैनात करण्यात आली आहेत. वर्दीतल्या दर्दींचा येथे ठराविक कोड ठेवण्यात आल्याचाही चर्चा आहेत. तर याच मंडळीच्या आशीर्वाद व सल्ल्यावरून सातत्याने एका जागेवरून दुसर्‍या जागेवर असा स्थलांतरित हा व्यवसाय चालतो आहे. एकूणच सध्या मोठ्या प्रमाणावर बोकाळत चाललेल्या या बेकायदेशीर धंद्याना स्थानिक पोलीस यंत्रणा आवरूच शकत नाही का? अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रातून व प्रामुख्याने महिला वर्गातून व्यक्त होत आहेत.

जिल्हा पोलिसांना जमते ते स्थानिकांना का नाही...

मध्यंतरी तालुक्यातील मल्हारपेठ, कोयना आदि विभागात सातारा पोलिसांनी छापे टाकले त्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारू धंदे करणारे सापडले. त्यामुळे बाहेरच्या अधिकार्‍यांना जर कधितरी येऊनही या कारवाया सहजशक्य होत असतील तर मग स्थानिक रात्रंदिवस येथे कार्यरत असणार्‍या पोलिसांना या बाबी माहीत असुनही कारवाया होत नसल्याने स्वाभाविकच यामुळे आर्थिक देवाणघेवाण अथवा हप्ता याबाबत सामान्यांच्या मनात प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.