Thu, Apr 25, 2019 04:13होमपेज › Satara › पिशवी बंद दूध 2 ते 3 रुपयांनी महागणार? 

पिशवी बंद दूध 2 ते 3 रुपयांनी महागणार? 

Published On: Aug 04 2018 1:37AM | Last Updated: Aug 03 2018 11:09PMसातारा : महेंद्र खंदारे

राज्यभरात दूध उत्पादकांनी आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने 5 रुपये अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. याची अंमलबजावणी बुधवारपासून सुरूही झाली आहे. दूध उत्पादकांना आता प्रत्येक दूध संघांकडून प्रतिलिटर 25 रुपये दर मिळणार आहे. त्यामुळे दूध संघांना प्रतिलिटर सुमारे 2 ते 3 रुपयांचा फटका बसणार आहे. परिणामी हे पैसे पिशवी बंद दुधाचे  दर वाढवून तोटा भरुन काढण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पिशवी बंद दुधाचे दर 2 ते 3 रुपयांनी महागण्याची चिन्हे आहेत.

यामुळे दूध संघाना तोटा होणार असल्याने पिशवीतील दुधामध्ये 2 ते 3 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. याचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार आहे. खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात दूध आंदोलन करण्यात आले होते. त्याचा परिपाक म्हणून राज्य शासनाने प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देण्याचे मान्य केले होते. यानंतर शासन निर्णय जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, यामध्ये गोंधळाची परिस्थिती झाल्याने दि. 31 जुलै रोजी दूध संघ व शासनाच्या पदाधिकार्‍यांची बैठक होऊन यावर तोडगा काढण्यात आला. निर्यातक्षम दूध भुकटीला प्रतिकिलो 50 रूपये अनुदान व दुधाला 5 रूपये अनुदान देण्याचे ठरले होते. मात्र, पिशवीबंद दुधाला कोणतेही अनुदान देण्यात येणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. 
दूध आंदोलनापूर्वी दूधाचा दर 17 ते 18 रूपये प्रतिलिटर होता. आंदोलनात प्रतिलिटर 25 रूपये मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. सरकारने 5 रूपये अनुदान दिले. मात्र, वरील 2 ते 3 रूपयांचा फरक राहिला. हा फरक भरून काढण्यासाठी शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यात येणार नसल्याने काही दिवसांत पिशवीबंद दुधाचे दर वाढणार आहेत. प्रतिलिटर 2 ते 3 रूपयांनी हे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात रोज 4 लाख 28 हजार 400 लिटर दूधाचे पॅकिंग होते. यासह गोकुळ, अमूल हे दूधही बाहेरून जिल्ह्यात येते. त्यामुळे सुमारे 5 लाखाहून अधिक दूध पिशव्यांतून येते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रामुख्याने कोयना दूध संघ 49 हजार 700, संतकृपा दूध संघ 29 हजार 500, ममता डेअरी 17  हजार, स्वराज्य दूध संघ 31 हजार 500, गोविंद 1 लाख 63 हजार 900, हेरिटेज 32 हजार आणि सकस दूध 34 हजार लिटर यांचा समावेश आहे. 1 ते 3 हजार लिटर दूध पॅकिंग करणारेही प्लँट आहेत. शासनाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत अनुदानासाठी कोयना, संतकृपा, स्वराज्य, गोविंद व सकस दूध हे दूध संघ अनुदानासाठी पात्र ठरले आहेत. 

पिशवीबंद दूधाचे पॅकिंग, वितरणासाठी द्यावे लागणारे कमिशन यामुळे पॅकिंग दुधाचा विचार करता प्रत्येकी 2 रूपये तोटा गृहीत धरला तरी दूध संघांना दिवसाला 8 लाख 56 हजार रूपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी दूध संघांनी पॅकिंगच्या दुधाचे दर वाढवण्याची तयारी केली आहे. जानेवारी 2019 पर्यंत हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यानंतर जागतिक बाजारपेठेतील दूध पावडरच्या दरावर पुढील निर्णय घेण्यात येेणार आहे. अनुदान उत्पादकाच्या खात्यावर पोहोचवण्याची जबाबदारी दुग्ध विकास अधिकारी व आयुक्तांवर टाकण्यात आली आहे. दर 10 दिवसाला शेतकर्‍यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने हे अनुदान जमा करण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांना सुमारे 8 रुपयांचा फायदा
शासनाने दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे दूध डेअरी व दूध संघांनी दूध उत्पादकांना 25 रुपये देणे बंधनकारक आहे. आंदोलनापूर्वी गायीच्या दुधाचा दर हा 17 रुपये प्रतिलिटर होता. त्यानंतर आता थेट 25 रुपये मिळणार असल्याने उत्पादकांना 8 रुपयांचा फायदा झाला आहे. यामध्ये सरकारचे अनुदान 5 रुपये व संघांकडून 3 रूपये मिळणार आहेत. परंतु, यासाठी उत्पादकांना आपल्या दुधाचा दर्जा 3.5/8.5 ठेवावा लागणार आहे. अन्यथा दर कमी मिळणार आहे.