Tue, May 26, 2020 18:31होमपेज › Satara › शिवसेना पाटण, माण, कोरेगाव मतदारसंघ लढणार?

शिवसेना पाटण, माण, कोरेगाव मतदारसंघ लढणार?

Published On: Sep 29 2019 1:37AM | Last Updated: Sep 29 2019 1:37AM
सातारा : प्रतिनिधी 

भाजप व शिवसेनेची युती निश्‍चित समजली जात असून त्याद‍ृष्टीने जागा वाटपावर शेवटचा हात फिरवला जात आहे. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी 4 ठिकाणी शिवसेनेने दावा केला असून पाटण, माण व कोरेगाव हे मतदारसंघ निश्‍चित झाले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिली. उर्वरित वाई, कराड उत्तर व फलटण यापैकी एका मतदारसंघांवरही सेनेने हक्‍क सांगितला आहे. मात्र, कोणता एक मतदारसंघ सेनेला द्यायचा यावरून भाजपची कोंडी झाली आहे. जिल्ह्यातील या जागा वाटपावरून भाजप व सेनेत  शनिवारी रात्रीपर्यंत बराच खल सुरू होता. सेनेला सन्मानजनक जागा न मिळाल्यास युतीला सातारा जिल्ह्यातून तडाखा मिळण्याची चिन्हे आहेत.

भाजप-सेनेच्या जागा वाटपाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या जागा वाटपावर राष्ट्रवादीची बरीच गणिते अवलंबून असल्यामुळे जागा वाटपाकडे सार्‍यांच्याच नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यात निम्म्या-निम्म्या जागा लढवण्यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याचे वृत्त आहे. त्यानुसार पाटण व माण विधानसभा मतदारसंघ शिवसेना लढवणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिली. याशिवाय कोरेगावचाही निर्णय झाल्याचे जाधव यांनी सांगितले. सातारा व कराड दक्षिणमध्ये भाजप लढणार आहे.

उर्वरित वाई, फलटण व कराड उत्तर या मतदारसंघांपैकी एका मतदार संघांवर शिवसेनेने दावा सांगितला आहे. त्यामुळे हा एक मतदारसंघ कोणता याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. युती जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील उमेदवारांची नावे घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होण्याची शक्यता आहे. या उमेदवारांच्या यादीकडे सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  वांद्रे मुंबई येथील रंगशारदा सभागृहात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सकाळी बैठक बोलावली होती. या बैठकीस सातारा जिल्हयातून उपनेते प्रा.नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, यशवंत घाडगे, तालुकाप्रमुख व इच्छूक उमेदवार उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये मला शिवसेना पाहिजे, नेटाने तयारीला लागा, अशा सूचना दिल्या. 

भाजपचे उमेदवार सेनेच्या चिन्हावर लढणार?

शिवसेनेला चार जागा देण्याबाबत अंतिम निर्णय होत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेले उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. कराड उत्तरमधून मनोज घोरपडे, कोरेगावातून महेश शिंदे, वाईतून मदनदादा भोसले यांना शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याची वेळ येऊ शकते अर्थात भाजपने अद्यापही कोणतेही जागा वाटप निश्‍चित केलेले नाही. युती होणार नाही असे गृहित धरूनच भाजपने यापूर्वीच उमेदवार निश्‍चित केले आहेत.