Wed, May 27, 2020 08:20होमपेज › Satara › रणजितसिंह राष्ट्रवादीचे आव्हान मोडून काढणार का ?

रणजितसिंह राष्ट्रवादीचे आव्हान मोडून काढणार का?

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 30 2019 1:55AM
फलटण : यशवंत खलाटे 

मोहिते - पाटील गटाच्या भाजप प्रवेशापाठोपाठ काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष व फलटणचे युवा नेते रणजितसिंह ना. निंबाळकर यांनीही भाजप प्रवेश केला. आता निंबाळकरांना माढा लोकसभा मतदार संघाची उमेदवारीही देण्यात आल्यामुळे राजकीय समीकरणे पुरती बदलून गेली आहेत. नाईक निंबाळकर यांच्यापुढे राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्याचे आव्हान आहे. बदललेली समीकरणे कुणाच्या पथ्यावर पडणार? पूर्वाश्रमीचे वर्चस्व मोहिते-पाटील गट टिकवून ठेवणार का? याची उत्कंठा राजकीय पटलावर लागून राहिली आहे. 

सन 2009 मध्ये झालेल्या मतदार संघ पुनर्रचनेनंतर माढा लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आला. पुनर्रचनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत शरद पवार यांनी विजयाची पताका फडकावली. त्यावेळी त्यांना रासपचे महादेव जानकर, शिवसेना भाजप युतीचे सुभाष देशमुख, अपक्ष जे.टी. पोळ यांनी आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पवारांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर झालेल्या गतवेळच्या 2014 च्या निवडणुकीत सर्वत्र मोदी लाट आली होती. मात्र, तरीही राष्ट्रवादीच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी आपला हा गड शाबूत ठेवला होता. यापार्श्‍वभूमीवर यावेळची निवडणूक राष्ट्रवादीला सोपी जाणार असे बोलले जात असतानाच नाट्यमय घडामोडींनी मतदार संघ ढवळून निघाला. प्रारंभी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी मोहिते-पाटील गटाचेच नाव पुढे येत होते. त्यादरम्यानच दस्तुरखुद्द शरद पवार यांना माढ्यातून लढण्यासाठी कार्यकर्त्यांकडून आग्रह झाला. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत गटबाजी व भाऊबंदकी यामुळे शरद पवार यांनी येथून निवडणूक लढवण्याचा विचार पुढे आला. मात्र, त्यांनी बोलवलेल्या फलटणमधील पहिल्याच मेळाव्यात माण-खटाव मतदार संघातील नेते शेखर गोरे यांनी आपल्यावरील अन्यायाला वाट मोकळी करून देताना राडा केला. या अभूतपूर्व घटनेनंतर शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.  त्यामुळे येथील उमेदवारीचा सस्पेन्स निर्माण झाला. नाट्यमय घडामोडी घडत रणजितसिंह मोहिते-पाटलांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. संपूर्ण मोहिते-पाटील गट भाजपवासी झाल्याने मतदार संघातील चित्रच पालटून गेले. पाठोपाठ रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजपला आणखी एक दमदार नेतृत्व मिळाले. काँग्रेसला खिंडार पाडत भाजपने निंबाळकरांना आपल्या पक्षात सामावून घेतले.  रणजितसिंह ना. निंबाळकरांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांच्या माढ्यातील उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. बर्‍याच घडामोडीनंतर अखेर ही उमेदवारी फायनल झाली. त्यामुळे माढा मतदार संघात आता संजयमामा विरूद्ध रणजितसिंहांमधील लढत राजकीय पटलावर खळबळ उडवणारी ठरणार आहे. 

माढा मतदार संघातील राजकीय बलाबल पाहिले असता रणजितसिंह ना. निंबाळकर यांना सध्या तरी अनुकुल वातावरण असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.   या मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण-खटाव व फलटण - कोरेगाव या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. माढ्यातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे हे आमदार आहेत.  ते संजयमामा शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. करमाळा हा संजयमामांचा स्वत:चा विधानसभा मतदार संघ आहे. येथे शिवसेनेचा आमदार असला तरी राष्ट्रवादीची ताकद सर्वाधिक आहे. पक्षांतर्गत फुटीमुळे येथे सेनेला विजयश्री मिळाली होती. सांगोला मतदार संघातून शेकापचे गणपतराव देशमुख आमदार असून त्यांचा राष्ट्रवादीकडे उघउ उघड कल आहे. माळशिरस मतदार संघात हणमंतराव डोळस हे राष्ट्रवादीचे आमदार असले तरी मोहिते-पाटलांचे कट्टर समर्थक आहेत.  या मतदार संघात मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण- कोरेगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे  दीपक चव्हाण  आमदार असले तरी ना. रामराजे नाईक निंबाळकर यांचाच या मतदार संघावर पगडा आहे तर माण-खटाव मतदार संघात काँग्रेसचे जयकुमार गोरे आमदार आहेत. आ. जयकुमार गोरे यांचा माण मतदार संघात प्रभाव आहे. आ. जयकुमार गोरे यांची ताकद महत्वाची आहे. ते कुणाला मदत करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.  या मतदार संघात आ. गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांचाही मोठा गट असून त्यांची भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय भाजपचे मंत्री ना. सुभाष देशमुख, पालकमंत्री ना. विजय देशमुख  यांचीही लोकसभा मतदार संघात पकड आहे. काही प्रमाणात शिवसेनेचीही या मतदार संघात व्होट बँक आहे. या पार्श्‍वभूमीवर होत असलेली संजयमामा व रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यातील लढत लक्षवेधक ठरणार आहे.

रणजितसिंह ना. निंबाळकर हे धडाडीचे व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा लोकसंग्रहही प्रचंड आहे. त्यांना भाजप-शिवसेनेची मिळालेली भक्कम साथ, मोहिते पाटील गटाची बांधणी यामुळे भाजपकडून त्यांच्या विजयाचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे संजयमामा शिंदे यांच्या विजयाचीही राष्ट्रवादी व काँग्रेसकडून गणिते मांडली जात आहेत. आता प्रत्यक्षात प्रचार काळात उडणारी रणधुमाळी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी व फोडाफोडीचे राजकारण यामध्ये कोण बाजी मारणार? यावरच  विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होणार आहे.