Thu, Mar 21, 2019 15:54होमपेज › Satara › पर्यावरण रक्षणासाठी माणसांची झाली माकडं 

पर्यावरण रक्षणासाठी माणसांची झाली माकडं 

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 10:05PMपाटण : गणेशचंद्र  पिसाळ

माकडाचा माणूस झाला, हे जगजाहीर आहेच. मात्र कोयना विभागात गेल्या काही वर्षांतील चित्र नेमके उलटे आहे. मानवासाठी येथे विविध कायदे, जाचक अटी व निर्बंध घातले जात असताना वन्य प्राण्यांसाठी पायघड्या घालण्याचे काम सुरू झाले. पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली येथे माणसाचं माकड बनविण्याचा प्रयत्न सुरू असून तो कोयनेच्या मुळावर उठला आहे.  

वन्य प्राण्यांचे  व  पर्यावरणाच रक्षण झालच पाहिजे, मात्र त्याचवेळी स्थानिकांवर अन्याय करणे जनहिताच ठरते का? याचाही सार्वत्रिक विचार होणे गरजेचे बनले आहे. कोयना विभागात यापूर्वी धरण व जलविद्युत प्रकल्प यामुळे या प्रकल्पांसाठी पूरक असे अन्य छोटे, मोठे प्रकल्प येथे सुरू होते. धरण निर्मितीमध्ये काही गावांबरोबरच स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे संसारही उठले. अनेक प्रकल्प बंद पडले, तर नियोजित प्रकल्प जाणीवपूर्वक लालफितीतच अडकवून ठेवल्याने खाजगी ठेकेदार कंपन्या  सोडून गेले.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने येथील शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली.  बाजारपेठाही ओस पडल्याने व्यापार्‍यांनीही पाठ फिरवली. पर्यटन वाढीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पर्यटकांचीही संख्या कमी झाली. स्थानिकांनी स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे येथे जंगले राखली. त्यांच्यावरच पर्यावरण रक्षणाचे मानव निर्मित प्रकल्प लादले. कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प यामुळे येथे देशोधडीला लागलेला स्थानिक दिवसेंदिवस अडचणीत आला. पर्यावरण पूरक प्रकल्प राबविताना प्राण्यांसोबत स्थानिक माणसांचाही विचार व्हावा. केवळ कागदोपत्री बागुलबुवा न करता माणूस केंद्रबिंदू ठेवून नियोजन केल्यास पर्यावरण व वन्यजीव रक्षणही होईल यात शंका नाही.