Fri, Jul 19, 2019 01:07होमपेज › Satara › हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:43PM

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

फलटणमध्ये बिबट्याचा वावर असल्याच्या बातमीने तालुका हादरून गेला असतानाच फरांदवाडीत तांबमाळ येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेळी ठार झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी भेट देऊन मृत शेळीची तपासणी केल्यानंतर हा हल्ला तरसाने केल्याची शक्यता फलटणचे वनक्षेत्रपाल फलटण सुरेश घाडगे यांनी  व्यक्त केली आहे. 

फरांदवाडी येथे शनिवारी रात्री 7.15च्या सुमारास तांबमाळ परिसरात राजेंद्र बबन जाधव यांच्या घरासमोर बांधलेल्या 3 शेळ्यांपैकी एका शेळीवर हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनअधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी परिसरातील वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे घेवून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे कास्टिंग तयार करुन सातारा येथे पाठवण्यात आले. विभागीय कार्यालयाने संबंधित ठसे तरसाचे असल्याचे कळवले. यामुळे शेळीवरील हल्ला बिबट्याचा नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे वनक्षेत्रपाल घाडगे यांनी सांगितले. 

प्रत्यक्षदर्शीनींही शेळीवर हल्ला करणारा प्राणी तरस असू शकतो हे सांगितल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दि. 29 रोजी सिटी प्राईडच्या सीसीटिव्हीत बिबट्याचा वावर आढळल्यानंतर सहाय्यक वनसंरक्षक एस. बी. चव्हाण व सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी सिनेमागृह व बाणगंगा नदी परिसरासह संपूर्ण शहर अक्षरश: पिंजून काढले होते. तरीही बिबट्या आढळून आला नव्हता. तरीही बिबट्याची शक्यता लक्षात घेवून नागरिक व शेतकर्‍यांनी रात्री-अपरात्री फिरताना दक्षता घ्यावी व खात्री झाल्याशिवाय माहिती सोशल मीडियावर प्रसारित न करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.