Tue, Mar 19, 2019 05:29होमपेज › Satara › कुख्यात गुन्हेगाराकडून पत्नीचा खून

कुख्यात गुन्हेगाराकडून पत्नीचा खून

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 10:33PMखंडाळा : वार्ताहर  

कण्हेरी (ता. खंडाळा) येथील कुख्यात गुन्हेगार खालिद अहमद शेख (वय  36) याने घरगुती वादातून पत्नी सना ऊर्फ मनीषा खालिद शेख हिचा मारहाण करून खून केल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, संशयित खालिद शेख याने पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सना शेख हिच्या शरीरावर मारहाणीच्या व्रणाने पोलिसांनी मृत्यूचे खरे कारण काही  वेळातच उघड करत संशयित खालिद याला ताब्यात घेऊन अटक केली.

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खालिद शेख हा गत काही वर्षांपूर्वी आई-वडिलांसमवेत पुणे येथील पिंपळे गुरव परिसरात राहत होता. या दरम्यान शालेय शिक्षण घेत असताना सना ऊर्फ मनीषाबरोबर प्रेमाचेही धडे गिरवू लागला. यानंतर दोघांच्याही घरच्यांचा विरोध पत्करून खालिद व सना ऊर्फ मनीषाने पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर मूळ गाव कण्हेरी या ठिकाणी आपला संसार थाटला. या दरम्यान काही वर्षांत त्यांना दोन मुले झाल्याने त्यांचा संसार अधिकच बहरू लागला होता. परंतु, खालिद हा याच काळात व्यसनाच्या आहारी गेला व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. घरफोडी, चोरी मारामारी, लूटमार अशा प्रकारच्या गुन्ह्यात तो सातारा व खंडाळा पोलीसांना सापडला होता. 

खालिद याच्यावर विविध प्रकारचे नऊ गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही पोलीसांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. असे असताना त्याचे आणि पत्नीचेही घरगुती कारणावरून भांडण होण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली होती. रोजच्या भांडणातून खालिद याने पत्नीस बुधवार दि. 10 रोजी रात्रीही बेदम मारहाण करत तिचे डोके जमिनीवर आदळले यामध्येच तिचा मृत्यू झाला.

या नंतर पहाटेच्या सुमारास गावातील काही व्यक्तींना पत्नीचा मृत्यू झाला असल्याची कल्पना खालिद शेख याने दिली व ती आजारी असल्याने आत्महत्या केल्याचाही बनाव केला. आजारपण, आत्महत्या की खून या तिन्ही गोष्टींचा विचार करून खंडाळा पोलीसांनी मृतदेह खंडाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. या दरम्यान डोक्याला झालेल्या गंभीर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाल्यानंतर पोलीसांना मृत्यूचे गुढ उलगडले. तद्दनंतर सना उर्फ मनिषा शेख हिच्या खुनाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. या घटनेचा तपास स.पो. नि. हणमंत गायकवाड हे करत आहेत.