Thu, Jul 18, 2019 01:04होमपेज › Satara › पत्नी, आईला भोसकून मुलाचे स्वत:वरही वार 

पत्नी, आईला भोसकून मुलाचे स्वत:वरही वार 

Published On: Jul 01 2018 1:53AM | Last Updated: Jun 30 2018 10:59PMकराड/तासवडे टोल नाका : प्रतिनिधी 

कौटुंबिक वादातून मुलाने धारदार शस्त्राने आई व पत्नीसह स्वत:वरही वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वराडे (ता. कराड) येथे शुक्रवारी रात्री 9.30 वा.च्या सुमारास हा धक्‍कादायक प्रकार घडला. सागर सदाशिव घोरपडे (वय 36, रा. वराडे) असे हल्लेखोर मुलाचे नाव असून, या हल्ल्यात त्याची पत्नी मोहिनीचा जागीच मृत्यू झाला, तर आई कल्पना घोरपडे व तो स्वत:ही गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सागर सदाशिव घोरपडे हा वराडे येथे पत्नी मोहिनी, आई कल्पना घोरपडे व दोन मुलांसह राहत आहे. सागर याचा स्वतःच्या मालकीचा ट्रक असून, तो स्वतः चालवतो.

शुक्रवार, दि. 29 रोजी वडील सदाशिव घोरपडे हे ट्रकभाडे घेऊन बाहेर गावी गेले होते. सागर घरीच होता. पत्नी व आईमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला होता. रात्री 9.30 वा.च्या सुमारास जेवण झाल्यानंतर सागरने पत्नी मोहिनी व आई कल्पना घोरपडे यांना घराच्या पाठीमागील खोलीत बोलावून घेतले.  काही कळायच्या आत सागरने धारधार चाकूने पत्नी व आईला भोसकले. त्यांनी आरडाओरडा केला मात्र सागर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या हल्ल्यात पत्नी मोहिनीच्या पोटात वर्मी वार झाल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. तर आई गंभीर जखमी झाली. त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरडा केल्यानंतर शेेजारील संतोष प्रताप घाडगे त्या ठिकाणी धावत आले. समोरील दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घराच्या पाठिमागील बाजूने घरात प्रवेश केला. त्यावेळी कल्पना घोरपडे या स्वयंपाक घरात जखमी अवस्थेत पडल्या होत्या. तर मधल्या खोलीत मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्या होत्या. त्याच खोलीत सागरही बेडवर जखमी अवस्थेत पडला होता. दोन्ही मुलेही त्याच खोलीत होती.

ग्रामस्थांनी तातडीने जखमी तिघांनाही  जीपने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलविले. उपचारापूर्वीच मोहिनी घोरपडे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तर कल्पना घोरपडे व सागर हे दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. सागरच्या या कृत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, कौटुंबिक वादातून किंवा आर्थिक कारणातून हे कृत्य घडले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबतची फिर्याद संतोष प्रतापराव घाडगे यांनी तळबीड पोलिस ठाण्यात दिली असून सागर घोरपडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि. वैशाली पाटील करत आहेत. 

सागरच्या पोटातून आतडी बाहेर..

रागाच्या भरात सागरने पत्नी मोहिनी व आई कल्पना घोरपडे यांना भोसकले व त्याच चाकूने स्वतःच्या पोटावरही त्याने तीन वार करून घेतले. खोल जखमा झाल्याने सागरच्या पोटातील आतडी बाहेर पडली होती. तो बेडवर बेशुध्द अवस्थेत पडला होता. तर त्याच खोलीत त्याची पत्नी मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात  निपचीत पडली होती. तिच्याही पोटात खोलवर जखमा झाल्याने मोठा प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.