Sun, Jul 21, 2019 05:57होमपेज › Satara › खरंच सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्त झाले का?

खरंच सॅनिटरी नॅपकिन्स स्वस्त झाले का?

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:02PMसातारा : मीना शिंदे

अनेक महिला संघटना व महिला आघाड्यांच्या मागणीनंतर अखेर सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी मागे घेण्यात आला असला तरी, या नॅपकीन बनवण्यासाठी लागणार्‍या  कच्च्या मालावरील  जीएसटी मागे घेतला नसल्याने सॅनिटरी नॅपकीन्स स्वस्त होण्याची अपेक्षा ही  केवळ उपेक्षाच ठरत असल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसत आहे.

गेल्या वर्षभरापासून दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तूंवर सेवा कर लागू झाल्याने सर्वसामान्यांचा आर्थिक भार वाढला आहे. देशभरातील महिला  आघाडी, सामाजिक संघटनांनी आवाज उठवल्यानंतर  केंद्रीय अर्थंमंत्रालयाने  सॅनिटरी नॅपकिन्स, तसेच कार्पेरेट्स, रेफ्रिजरेटर्स, टीव्ही सेट, एसी इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तुवरील जीएसटी अखेर मागे घेण्याचा निर्णय  घेतला.   तरीदेखील याचा लाभ प्रत्यक्षात ग्राहकांना किती होतो याबाबत अजूनही संभ्रम आहे. 

सॅनिटरी नॅपकिनवर  जीएसटी  मागे घेतला असला तरी ते तयार करण्यासाठी लागणार्‍या  वस्तूंवरील कर मात्र कायम आहेत. त्यामुळे परदेशातून आयात होणार्‍या नॅपकीन्सच्या तुलनेत स्थानिक उत्पादकांना स्पर्धा करणे  अवघड जाणार आहे. छोट्या सॅनिटरी नॅपककिन्सची किंमत ग्राहकाला सुमारे 10 रुपये पडते. त्याचा उत्पादन खर्च 7.5 रुपये एवढा आहे. त्याशिवाय वाहतूक खर्च, वितरण, किरकोळ विक्रेत्याचा नफा या बाबींचा विचार केल्यास 10 रुपये किंमत होते. त्यामध्ये कापूस, सूती कापड, पॉलिथीन आणि प्‍लास्टिक पॅकिंग या घटकांवरपैकी कापूस जीएसटीमधून वगळण्यात आला आहे. 

या पार्श्‍वभूमीवर सॅनिटरी नॅपकिन्स्च्या किंमतीमध्ये सरासरी 1 रुपया कमी होणार असल्याने  फारसा फरक  जाणवणार नाही. सॅनिटरी नॅपकिनच्या किंमतीमध्ये कपात होण्यासाठी शासानाचा प्रयत्न असला तरी सॅनिटरी नॅपकिनच्या निर्मितीमधील समाविष्ट घटकांवरील सेवा कर कमी झाला नसल्याने प्रत्यक्षात मात्र जुन्या किंमतीमध्ये अजूनही सॅनिटरी नॅपकिन विकले जात आहेत. या नफाखोरीविरोधात शासनाने पावले उचलली तरच सॅनिटरी नॅपकिन्सवरील  सेवा कर मागे घेतल्याचा ग्राहकांना  लाभ मिळणार आहे.

नॅपकिन्सनिर्मिती घटकांवरील जीएसटी कायमच

सॅनिटरी नॅपकिनवरील जीएसटी  मागे घेण्यात आला असला तरी नॅपकीननिर्मितीतील घटकांवरील सेवा कर कायमच सॅनिटरी नॅपकिन्सनिर्मितीमधील पॉलिथीन फिल्म, डिंक यावर  18 टक्के कागद, लाकडाचा पल्प यावर 12 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे नॅपकिनवरील जीएसटी कमी करुनही अपेक्षित किंमत कमी होईल याची शाश्‍वती  नाही.