Mon, Mar 18, 2019 19:28होमपेज › Satara › भुयारी गटर काम करणार्‍या कंत्राटदार पटेलमागे कोण?

भुयारी गटर काम करणार्‍या कंत्राटदार पटेलमागे कोण?

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 10:50PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामात सबठेकेदार नेमल्याने खोळंबा झाला. यामुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पाणीपुरवठ्याचे काम रखडवणार्‍या सुरेंद्र इंजिनिअरिंग कंत्राटदारामागे कोण होते? आताही तेच होणार आहे. भुयारी गटर कामासाठी सबठेकेदार नेमला जाणार. हे काम करणार्‍या एस.  इन्फ्रा (पटेल) या कंत्राटदारामागे कोण आहे? अशा शब्दांत नविआ नगरसेवकांनी हल्‍लाबोल चढवला. दरम्यान, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी भुयारी गटर योजनेचे काटेकोर नियोजन करण्याची सूचना साविआ नगरसेवकांना  केली.

सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, मुख्याधिकारी शंकर गोरे, नगरसेविका स्मिता घोडके व नगरसेवकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी भुयारी गटर योजनेची  प्रोजेक्टरच्या सहाय्याने पीपीटीद्वारे माहिती दिली. ही योजना तीन टप्प्यात राबवण्यात येणार असून कामाच्या प्रगतीवर निधी उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 30 कोटींचा निधी मंजूर झाला असून अठरा महिन्यांत ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे. या कामामध्ये वितरिका, मुख्य लाईन, करंजे तसेच भिक्षेकरी गृह (सदरबझार)येथे दोन पंप हाऊस, एसटीपी प्‍लांट आदि कामे करण्यात येणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते अशोक मोने म्हणाले, भुयारी गटर योजनेचे भूमिपूजन होवून महिना झाला  तरी पंपहाऊससाठी जागा अद्याप उपलब्ध झाली नाही. असे असताना टेंडर काढण्याचा आणि ठेकेदार नेमण्याचा घाट कशासाठी? जलवाहिन्या, भुयारी गटरच्या वितरिका यांचा आराखडा नसल्याचे सांगत अमोल मोहिते यांनी नळकनेक्शन तुटल्यावर त्याचा खर्च कोण करणार? त्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली का? कामाची अशी पध्दत असते का? असा सवाल केला. मंजुर्‍या मिळेपर्यंत संबंधित ठेकेदाराचा कालावधी संपून जाणार आहे. वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले तशीच अवस्था याही योजनेची होणार आहे. पाणीपुरवठा योजनेचा ठेकेदार सुरेंद्र इंजिनियरिंग पळून गेला तसाच हाही ठेकेदार पळून जाईल.

या कामाचे टेंडर कुणाला दिले? अशी विचारणा अशोक मोने यांनी केली. भुयारी गटर कामासाठी सबठेकेदार नेमू नये. तशी शक्यता दिसत आहे. भुयारी गटर कामाच्या ठेकेदाराच्या पडद्याआड कोण आहेत? असा हल्‍ला  मोने, मोहिते यांनी करताच सभागृहातील वातावरण तापले.  स्मिता घोडके म्हणाल्या, भुयारी गटरचे काम चांगले झाले पाहिजे, अशी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची सूचना आहे. त्यानुसारच काम केले जाणार आहे.या कामासाठी कोणताही सबठेकेदार नेमला जाणार नसल्याचे घोडके यांनी स्पष्ट केले.  मोने म्हणाले, गटर योजनेच्या पाईप्स उपलब्ध झाल्यानंतरच खोदकाम करा. पावसाळ्यात रस्त्यांचे खोदकाम करु नये.भुयारी गटरचे काम एस. इफ्रा (पटेल) यांना दिले असून शहराच्या विकासासाठी ठेकेदारास सहकार्य केल्यास काम वेळेत पूर्ण होईल. संबंधित विभागांच्या मंजुर्‍या घेतल्या जातील,  असे  शंकर गोरे यांनी सांगितले. 

दरम्यान, या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती मिळू शकली नसल्याची खंत दोन्ही आघाडीच्या नगरसेवकांनी बोलून दाखवली. दरम्यान, बैठक संपताच खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची नगरपालिकेत एन्ट्री झाली. नगराध्यक्षांच्या दालनात त्यांनी आघाडीतील नगरसेवकांना सूचना केल्या. भुयारी गटरचे काम करताना वितरकांची व्यवस्था झाल्याशिवाय रस्ते खोदकाम करु नये. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या. योजनेचे चांगल्या पध्दतीने नियोजन करा, असे सांगत खा. उदयनराजेंनी नगरसेवकांची कामे करण्याची सूचनाही नगराध्यक्षांना केली. यावेळी आरोग्य सभापती यशोधन नारकर, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नगरसेवक किशोर शिंदे आदि उपस्थित होते.