Wed, Apr 24, 2019 21:31होमपेज › Satara › 'शांतीदूता’वरील ‘बुलडोझर’ कोणाच्या ‘खोपडी’तून?

'शांतीदूता’वरील ‘बुलडोझर’ कोणाच्या ‘खोपडी’तून?

Published On: Feb 09 2018 9:18PM | Last Updated: Feb 09 2018 9:17PMसातारा : हरिष पाटणे

8 फेब्रुवारीची रात्र सातारकरांचे काळीजमन अस्वस्थ करणारी होती. सातारा पोलिस मुख्यालय या हेरिटेज वास्तूच्या प्रवेशद्वारावर असलेले शांतीदूत कबुतराचे शिल्प आकस्मिकपणे प्रवेशद्वारापासून हटवून सातार्‍याबाहेर नेण्याची प्रक्रिया आरंभली गेली. माध्यमांमध्ये काम करणार्‍या प्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या कृत्याला आक्षेप घेतल्यानंतर सातारकरांच्या डोळ्यात धूळ टाकून अंधार्‍या रात्री कबुतर कोल्हापूरला घेवून जाण्याचे षड्‌यंत्र  थांबले गेले. असे जरी झाले असले तरी पोलिस मुख्यालय या वास्तुला ज्या शांतीदूतामुळे शान प्राप्त झाली होती तो शानदारपणा आता  शांतीदूत हटवल्याने अवकळेत रुपांतरीत झाल्याचा भास होत आहे. 

मुळातच सातारा ही छत्रपतींची राजधानी. महाराष्ट्रात सर्वाधिक हेरिटेज इमारती सातार्‍यात. गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू हीच सातार्‍याची दौलत आहे. ही दौलत जीवापाड जपण्याचा प्रयत्न सातारकर आपापल्या परिने करत आले आहेत. अशा शानदार प्रतिकांवर चार चॉंद लावून अशा इमारतींना जागतिक दर्जा प्राप्त करुन देण्याचे कामही सातार्‍यात यापूर्वी काम पाहिलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी केले आहे. अशा अधिकार्‍यांच्या नामावलीत सुरेश खोपडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 2000 साली खोपडे सातार्‍याचे पोलिस अधीक्षक होते. पारधी पुनर्वसनसारखा महत्वपूर्ण उपक्रम राबवून खोपडे यांनी जनमानसामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. सातार्‍याचा लाडका पोलिस प्रमुख ही ख्याती त्यांनी मिळवली होती. पत्रकारितेतील उमेदवारी करत असताना आमच्यासारख्या अनेकांना खोपडे यांची समाजशिलता त्या काळात भावली होती. सातारा पोलिस मुख्यालयाच्या बाहेर प्रवेशद्वारावर त्यावेळी चार तोफा होत्या. पोलिस व सामान्य माणसांमध्ये भीतीदायक पडदा नसावा असे खोपडे यांना वाटत होते. पोलिस मुख्यालयात येताना सर्वसामान्य जनतेच्या काळजात धस्स होता कामा नये, उलट इथे आपणाला न्याय मिळेल असे प्रत्येक अन्यायग्रस्ताला वाटले पाहिजे. या भूमिकेतून सुरेश खोपडे यांनी तोफा हटवून पोलिसांच्याच काडतुसांचा, गोळ्यांचा वापर करुन तिथे शांतीदूत कबुतराचा पुतळा बसवला. सातारा पोलिस मुख्यालयाबाहेरील हा शांतीदूत तेव्हापासून सातार्‍याची अस्मिता व प्रतिक ठरु लागला. गेल्या 18 वर्षांत या कबुतराने कधीच कुणाला डंख मारला नाही, कधी कुणाच्या अध्यात-मध्यात गेला नाही, कधी कुणाला तो रुतला नाही, जागेवरुन हलून इथल्या पोलिस अधिकार्‍याच्या चुगल्या तिथल्या पोलिस अधिकार्‍याला केल्या नाहीत, कुणाच्या चिठ्ठ्या - चपाट्या कुठे पुरवल्या नाहीत, यापूर्वीच्या कोणत्याही पोलिस अधिकार्‍याला त्याचा अडथळा वाटला नाही, मग 18 वर्षांनंतर नेमके असे काय घडले की रातोरात शांतीदूतावर ‘नांगर’ फिरवण्याचे कोणाच्यातरी सुपीक ‘खोपडी’त घुसले? फर्मान नेमके कुठून आले? आमचे कबुतर नेमके कुणाला आवडले? हेरिटेज प्रॉपर्टी पोलिस दलाची आहे हे कुणीच नाकारत नाही. पण कुणाला तरी ‘कबुतरे’ आवडतात म्हणून सातारकरांची अस्मिता असलेले हे शांतीदूत कबुतर आमच्यापासून पळवून घेवून जाण्यामागे नेमके कोणते शौर्य होते? कुणीही यावे आणि टिकलून जावे एवढी ही माती स्वस्त नाही. या मातीत अंगार जन्माला आला, इथे क्रांतीकारकांनी ब्रिटीश अधिकार्‍यांना पत्र्या ठोकल्या हा इतिहास जरा लक्षात घ्या. सातार्‍यात सगळेच षंढ आहेत  असा समज कुणाचा असेल तर ती घोडचूक ठरेल. या मातीला क्रांतीकारकांचा वारसा आहे हे सातारकरांना दाखवावेच लागेल. कुणी आमच्या प्रतिकांना धक्का लावत असेल तर, पळवून नेण्याचे दु:साहस दाखवत असेल तर डोक्यावर घेणार्‍यांना सातारकर पायाखालीही घेवू शकतात याचे भान अधिकार्‍यांनी ठेवले पाहिजे. 

शांतीदूताचे सातारकरांशी भावनिक नाते जडले आहे. पोलिस मुख्यालयाबाहेरील शांतीदूत कबुतर म्हणजे कुणाच्या लेखी निर्जीव पुतळा असेल मात्र गेल्या 18 वर्षांत हजारो अन्यायग्रस्तांच्या  डोळ्यातील पाणी पिऊन त्या शांतीदूतामध्ये सातारकरांचा जीव भरला गेला होता. पोलिस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर चौथर्‍याशी घट्ट असलेला शांतीदूत केवळ पुतळा नव्हता तर इथल्या मातीचा, शौर्याचा, शांततेचा वारसा सार्‍या जगाला सांगणारे ते प्रतिक ठरले होते. मात्र, भावनेशी खेळणार्‍यांना सगळ्याच गोष्टी निर्जीव वाटतात.   रात्री शांतीदूताच्या गळ्याला  हूक लागला  होता तेव्हा पाहणार्‍यांच्या डोळ्यातही पाणी तराळले होते, ही भावना शांतीदूत हटवणार्‍यांच्या लक्षात कधीच येणार नाही. सुरेश खोपडे व विश्वास नांगरे-पाटील यांच्यामध्ये मतभेद असल्याचे बोलले जात आहे. त्यातून हे घडले असल्याचाही आरोप होत आहे. या आरोपांशी सातारकरांना देणे - घेणे नाही. सुरेश खोपडे यांच्या चांगल्या कामाचे जसे कौतुक केले आहे तसेच विश्वास नांगरे-पाटील यांनी जी चांगली कामे केली त्यांनाही सातारकरांनी डोक्यावर उचलून घेतले आहे. सातार्‍याचे सगळेच प्रश्न सुटले आहेत, सगळीच गुन्हेगारी समूळ नष्ट झाली आहे आणि आता पुतळ्याचाच तेवढा प्रश्न प्रलंबित आहे असे पोलिस अधिकार्‍यांना वाटते की काय? तसे असेल तर सगळी गुन्हेगारी नष्ट झाली आणि सातार्‍यात कायद्याचे राज्य आले हे जाहीर करुन दाखवा. रातोरात शांतीदूताच्या नरड्याला नख लावण्यापेक्षा सातारकरांच्या जीवाशी खेळणार्‍यांना फरफटत आणण्यासाठी वर्दी कामाला लावा.