Thu, Feb 21, 2019 17:12होमपेज › Satara › नागपूर अधिवेशनात आ. शशिकांत शिंदे यांनी काढले सरकारचे वाभाडे

भाजपने काढलेले कर्ज कुठे गेले?: आ. शिंदे

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 10:02PM

बुकमार्क करा

खटाव : प्रतिनिधी 

सध्याच्या सरकारच्या काळात शासनाच्या अनेक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. आम्ही पुरावे देवूनही मुख्यमंत्री भ्रष्टाचार्‍यांना क्लिनचिट देण्यात धन्यता मानत आहेत. भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात अडीच लाख कोटींचे कर्ज काढूनही काहीच कामे केली नाहीत. हे काढलेले कर्ज नक्की गेले कुठे? असा प्रश्‍न उपस्थित करत आ. शशिकांत शिंदे यांनी नागपूर अधिवेशनात सरकारचे वाभाडे काढले. गुजरातचा निकाल पहाता पुढच्या वेळी तुम्ही सत्तेत नसणार, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. bjp

नागपूर येथे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी आ. शशिकांत शिंदेंची तोफ चांगलीच धडाडली. आरोग्य, महावितरण आणि वैद्यकीय विभागात सुरु असलेल्या भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

देशातील प्रत्येक गाव व पाड्यातील प्रत्येक घरासाठी पंतप्रधानांनी विद्युत पुरवठा योजनेची घोषणा केली आहे. मात्र, अद्यापही अनेक  गावांमध्ये वीज पोहचलेली नाही. राज्यात पुरेसा कोळसा उपलब्ध नाही, त्यामुळे वीजनिर्मिती प्रकल्पांना मोठा फटका बसत आहे. वीज नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. याबाबत सभागृहात लक्षवेधी मांडली तरी अद्याप सरकारने काहीच केलेले नाही. 

आरोग्य विभागातही अनागोंदी सुरु आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी, औषधे नाहीत. खासगी रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरु आहे. कोणत्या ऑपरेशनसाठी किती खर्च असावा हे प्रत्येक रुग्णालयात नमूद करण्याचा सरकारने कायदा करावा.  हल्ली  5 लाखापासून पुढे अगदी 25, 50 लाखांपर्यंत शत्रक्रियेसाठी पैसे घेतले जातात. याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. तसा कायदा करावा आणि ही लुटमार थांबवावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी विधिमंडळात केली.