Sun, Jul 12, 2020 21:59होमपेज › Satara › देगाव तलावाची गळती निघणार कधी?

देगाव तलावाची गळती निघणार कधी?

Published On: Dec 18 2017 2:43AM | Last Updated: Dec 17 2017 10:40PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

देगाव, ता. सातारा येथील पाटेश्‍वर पायथ्यालगत असलेल्या  पाझर तलावाला गेल्या काही दिवसांपासून गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत  आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी विविध विभागाला तोंडी व लेखी निवेदन देऊनही कोणी दखल घेत नाहीत.

सन 1972 साली पडलेल्या दुष्काळात देगाव येथे पाटेश्‍वर पायथ्यालगत महाकाय तलाव बांधण्यात आला होता. या तलावामधून देगाव, राजेवाडी, निगडी व कारंडवाडी  येथील शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटत होता. या तलावाच्या पाण्यातून वळसे व बोरगाव येथील धरणे भरत होती. या तलावामुळे या परिसरातील गावांचे बहुतांश शेती ओलिताखाली आली होती. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून या तलावाला गळती लागली आहे. त्यामुळे येथील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

देगाव येथील ग्रामस्थांनी या गळतीबाबत संबंधित विभागासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला मात्र कोणीही दखल घेत नसल्याने येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावयाचा असा प्रश्‍न येथील ग्रामस्थांना पडला आहे.

तलावातून सध्या मोठ्या प्रमाणात  गळती लागली आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात तलावात संपूर्ण खडखडात होणार आहे. तलावाची त्वरित डागडुजी करून गळती काढल्यास पाणी साठणार आहे. त्यामुळे शेती व पिण्याचा प्रश्‍न मिटणार आहे. तसेच तलाव व परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने  झाडे झुडपे तोडून डागडूजी करावी. याबाबत प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास येथील ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.