Fri, Apr 19, 2019 08:21होमपेज › Satara › कर्जमाफी होणार तरी कधी?

कर्जमाफी होणार तरी कधी?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फलटण : यशवंत खलाटे 

शेतकरी कर्जमाफीची घोषणा होवून चार महिने झाले तरी शेतकर्‍यांच्या पदरात अद्याप काहीच पडलेले नाही. कर्जमाफीबाबत सर्वच नेतेमंडळी उलटसुलट प्रतिक्रिया देत असली तरी प्रत्यक्षात मात्र, कर्जमाफीच्या कागदपत्रांची पूर्तता आणि त्यासाठी हेलपाटे मारुन बळीराजा मेटाकुटीला आला आहे. दररोज एक नवीन नियम सांगितला जात असल्याने शेतकरी कर्जमाफी मिळणार तरी कधी? असा उद्विग्न सवाल करत आहे. 

शेतकरी कर्जमाफीची घोषणा चार महिने झाले. तेव्हापासून राज्य शासनाने लावलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करण्यात शेतकरी करत असून  सोसायटी, सहकार खाते व अन्य ठिकाणी हेलपाटे मारुन कागदपत्रांची पूर्तताही केली. मात्र, प्रत्येकवेळी नवीन नियम आणि कागदपत्रांची मागणी होत असल्याने शेतकरी पूर्णत: त्रासुन गेला आहे. सहाय्यक निंबधक कार्यालय, जिल्हा बँक किंवा चावडी वाचनाच्या निमित्ताने यामध्ये सहभागी झालेले तहसीलदारही कर्जमाफीबाबत काहीही सांगण्यात उत्सुक नाहीत. 

शासनाने कर्जमाफीच्या अर्जात कोणी ग्रा. पं. सदस्य, सोसायटी संचालक, चेअरमन, सरपंच आहे का अशी विचारणा करणारा नवा खलीता पाठवून संपूर्ण याद्या पुन्हा तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या निकषात ही कर्जमाफी पुन्हा अडकल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्जमाफी नक्की मिळणार तरी आहे का? असा सवाल फलटण तालुक्यातील शेतककरी करत आहेत.

दरम्यान फलटण तालुक्यातील एका शेतकर्‍याची राष्ट्रीयकृत बँकेत 1 लाख 79 हजारांची थकबाकी होती. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्याला दीड लाखाची कर्जमाफी अपेक्षित होती. प्रत्यक्षात खात्यावर 96 हजार जमा झाले. याबाबत विचारणा करत तो शेतकरी थेट मंत्रालयात गेला. तेथे त्याला फलटणच्या सहाय्यक निंबधक सहकारी संस्थेत माहिती घ्यायला सांगून बोळवण केली. शेतकरी कर्जमाफीकडे डोळे लावून बसला असताना शासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. 

सॉफ्टवेअरमध्ये रामचंद्र म्हणजे गॉड अन् पुतळाबाई स्टॅचू

सॉफ्टवेअरमध्ये एकाद्याचे नाव रामचंद्र असेल तर तेथे गॉड किंवा एखाद्या महिला शेतकर्‍याचे नाव पुतळाबाई असेल तर तेथे स्टॅच्यू असे दिसत असल्याने त्यामध्येही अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत.