Sun, Aug 25, 2019 12:15होमपेज › Satara › आयोगाच्या प्रतिकूल मतावर काय करणार?

आयोगाच्या प्रतिकूल मतावर काय करणार?

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 06 2018 10:40PMकराड : प्रतिनिधी

राज्य मागासवर्गीय आयोगाने 2014 साली मराठा आरक्षणाबाबत प्रतिकूल मत नोंदवले होते. त्यानंतरही अध्यादेश काढून आरक्षण जाहीर केले होते. हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी पार पाडण्याकडे युती शासनाने दुर्लक्ष करत मराठा समाजावर अन्याय केला आहे. आता पुन्हा राज्य मागासवर्गीय आयोगाचे कारण सांगत तीन महिन्यांची मुदत मागत आहेत; पण गेली चार वर्षे शासनाने काय केले, अशी विचारणा करत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल प्रतिकूल आल्यास शासन काय करणार, असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

कराड (जि. सातारा) येथील दत्त चौकात गेल्या सहा दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या आंदोलनास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री माझ्यावर आपण अध्यादेश काढून घाईत मराठा आरक्षण जाहीर केल्याचा आरोप करत आहेत. पण तो चुकीचा आहे, असेही आ. पृृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

आपण मुख्यमंत्री असताना डिसेंबर 2012 मध्येच राणे समितीची स्थापना केली होती. या समितीच्या माध्यमातून 15 महिने राज्यातील विविध भागात मराठा समाजाच्या आर्थिक तसेच अन्य बाबींची सखोल पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर जून 2014 ला राणे समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचेही मत मागवण्यात आले होते. मात्र, तत्कालीन आयोगाने प्रतिकूल मत नोंदवले. त्यामुळे मराठा समाजाची सध्यस्थिती लक्षात घेत आपण मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. 

त्याबाबतचा अध्यादेश काढला होता. अध्यादेश हा कायदाच असतो. पण युती शासनाने तो टिकवला नाही. आता मुख्यमंत्री चार महिन्यांची मुदत मागत आहेत. पण चार वर्ष काय केले ते अगोदर सांगा ? असा प्रश्‍न उपस्थित करत आता मुख्यमंत्री वारंवार राज्य मागासवर्गीय आयोगाकडे बोट दाखवत आहेत. पण आता पुन्हा या आयोगाने मराठा आरक्षणाविरोधी प्रतिकूल मत नोंदवल्यास शासन काय करणार? शासनाकडे दुसरा प्लॅन आहे का? असे प्रश्‍न उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठीच गेली चार वर्ष शासन गप्प होते, असा आरोपही आ. चव्हाण यांनी केला. तसेच शासनावर टीका केली.

दिल्लीतील बैठकीत वस्तुस्थिती मांडणार....

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत दिल्लीत मंगळवारी काँग्रेस नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आपण मराठा समाजाची वस्तुस्थिती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर मांडणार आहोत. काँग्रेसनेच मराठा समाजाला आरक्षण दिले होते आणि आताही आम्ही ठाम भूमिका घेणार आहोत, असेही माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितले.