Fri, Jun 05, 2020 13:04होमपेज › Satara › श्रीनिवास पाटील यांनी खासदार असताना काय विकास केला? : उदयनराजे भोसले

श्रीनिवास पाटील यांनी खासदार असताना काय विकास केला? : उदयनराजे भोसले

Published On: Oct 02 2019 1:59AM | Last Updated: Oct 02 2019 12:40AM
सातारा : प्रतिनिधी

श्रीनिवास पाटील मला वडिलधारे  आहेत. त्यांनी यापूर्वी प्रशासकीय व राजकीय पदे भूषवली आहेत. ते अभ्यासू असून याचा फायदा राज्याला झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर  माझ्या व  त्यांच्या विकासकामांची तुलना केली जाईल. मी माझ्या जाहीरनाम्यानुसार कामे केली आहे. त्यांनी मात्र 10 वर्षे खासदार असताना काय कामे  केली? हे जनतेला सांगावे, असे आव्हान श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिले.  

जलमंदिर पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे म्हणाले, ही लोकशाही आहे कोणी तरी उमेदवार असणारच. श्रीनिवास पाटील हे  वडिलधारे असून त्यांनी पूर्वीही विविध पदे भूषवली आहेत. कितीही स्मार्ट किंवा ताकदवर उमेदवार असला तरी लोकांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्‍न जाणून घेवून लोकाभिमुख काम करणारा उमेदवार असावा ही  बाब मलाही लागू पडते. 

पाच वर्षानंतर लोकशाहीच्या निवडणुका या अटळ असतात. या निवडणुकीला सामोरे जात असताना माझ्या मनात एक प्रकारची द्विधा मनस्थिती, दडपण होते. ते दडपण आता नाहीसे झाले असल्याचे सांगून ते म्हणाले, मोकळ्या मनाने लोकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याकरता जी अपेक्षा असते त्याकरता मी प्रयत्न निश्‍चित करेन. याअगोदर आलेला अनुभव तितका चांगलासा नव्हता. त्याबाबत शरद पवार यांच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिले होते. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. 

उदयनराजे म्हणाले, विकासकामांवर आधारित राजकारणालाच मी महत्व दिले. यामुळे कोणाची अडचण झाली असेल तर त्याचे मला देणेघेणे नाही.  लोकांच्या प्रश्‍नांसाठीच तीन महिन्यात राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर मी त्रस्त झालो होतो, वैतागलो होतो. राजकारण करायचे तरी कशासाठी? लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय  नाही मिळाला तर लोकांचा गैरसमज होईल. आता यापुढेही विकासाचेच राजकारण केले जाईल. 

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न इच्छाशक्‍ती नसल्याने मार्गी लागला नव्हता. भाजपने हा प्रश्‍न निकाली काढला असून धनगर समाजालाही आरक्षण देण्याबाबत प्रयत्न सुरू आहे, असेही उदयनराजे म्हणाले.