Tue, Jun 18, 2019 23:06होमपेज › Satara › जिल्हा परिषदेत कृत्रिम पाणी टंचाई 

जिल्हा परिषदेत कृत्रिम पाणी टंचाई 

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:09PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेतच गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने झेडपीच्या कर्मचार्‍यांनाच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सुरक्षा रक्षकांच्या भांडणात कर्मचार्‍यांना पाण्यावाचून तडफडावे लागत असल्याचा सूर जि.प. वर्तुळात आळवला जात आहे.

जिल्हा परिषद  हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जिल्ह्याच्या विविध भागातून कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची सतत वर्दळ असते. अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांच्याकडे कार्यकर्त्यांची सतत ये-जा असते. जिल्हाभरातून लांबचा प्रवास करून नागरिक येत असतात. कामानिमित्त त्यांचा अख्खा दिवस झेडपीमध्ये जात असतो. मात्र, गेल्या 8 दिवसांपासून  झेडपीत कृत्रिम पाणी टंचाईचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे.

दिवसभर पाणी प्यायला मिळत नसल्याने संताप व्यक्‍त होत आहे. सुरक्षा रक्षकांच्या भांडणात  पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाला पाणी सोडण्यासंदर्भात अनेक कर्मचार्‍यांनी विनवणी केली तरी हे कर्मचारी पाणी सोडत नाहीत. पाणी असूनही वेळेत उपलब्ध होत नाही त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्‍न येथील कर्मचार्‍यांना पडला आहे. अनेक कार्यालयातील कर्मचारी पाण्याचे मोठे जार विकत आणून आपली तहान भागवत आहेत.  काही अधिकार्‍यांनी तर आपल्या कार्यालयात पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स आणले आहेत.

पिण्याचे पाणी नसल्याने विविध विभागातील कर्मचार्‍यांना पिण्यासाठी घरूनच पाण्याच्या बाटल्या आणाव्या लागत आहेत. याबाबत विविध विभागातील कर्मचार्‍यांनी पाण्यासाठी प्रशासनाकडे तक्रारी केली. मात्र, कोणीही दखल घेत नाही.

कर्मचार्‍यांची वणवण भटकंती...

जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवल्या जातात. मात्र, या ठिकाणीच  येथील कर्मचार्‍यांना पाण्याअभावी गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.  आपली तहान भागवण्यासाठी  काही कर्मचार्‍यांना वणवण भटकावे लागत आहे. देशासह राज्यभर डंका पिटणार्‍या  झेडपीमध्येच पाणी टंचाई जाणवू लागल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.