Mon, May 20, 2019 10:06होमपेज › Satara › पाणी टंचाईबाबत हयगय खपवून घेणार नाही : आ. शशिकांत शिंदे

पाणी टंचाईबाबत हयगय खपवून घेणार नाही : आ. शशिकांत शिंदे

Published On: May 24 2018 1:33AM | Last Updated: May 23 2018 11:00PMकोरेगाव : प्रतिनिधी

उन्हाळा उजाडला की, पाणी टंचाईबाबत जागे व्हायचे आणि आराखडा तयार करायचा. जरासा पाऊस झाला की आराखडा बाजूला टाकून द्यायचा  हे योग्य नाही. तालुक्यात पाणी टंचाईबाबत कसल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी दिला. 

पंचायत समिती सभागृहात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत आ. शिंदे बोलत होते. यावेळी सभापती  राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, प्रांताधिकारी कीर्ती नलावडे, निवासी नायब तहसीलदार श्रीरंग मदने, गटविकास अधिकारी सतीश मगर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच व मान्यवर उपस्थित होते.

आ. शिंदे म्हणाले, मे महिना सुरु झाल्याने तालुक्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली आहे. टँकर, कूपनलिका आणि विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तातडीने मार्गी लागले पाहिजेत, याबाबत ग्रामस्थ पुढाकार घेत आहेत, मात्र, प्रशासकीय स्तरावर दिरंगाई होत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. पाणी टंचाईबाबत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.  टंचाईबाबत अनास्था दिसून आल्यास कारवाईच्या सूचना दिल्या जातील. जलयुक्‍त शिवार योजनेच्या कामामुळे तालुक्यातील टंचाई कमी होत आहे. त्यामुळे पाणी टंचाईकडेच दुर्लक्ष करुन चालणार नाही. तालुक्यात एकही कूपनलिका मंजूर नाही, हे मोठे दुर्दैव आहे. याबाबत अधिकार्‍यांनी दक्षता घेतली पाहिजे. 

राजाभाऊ जगदाळे यांनी तालुक्यातील टंचाईचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय  दाहकता वाढली असल्याचे निदर्शनास आणून दिले. तालुक्यात टंचाई निवारण्यासाठी एकही काम झाले नाही. गेल्यावर्षी प्रस्तावित असलेली किती कामे मंजूर झाली, त्यापैकी किती कामे झाली, त्यावर किती निधी खर्च झाला, याबाबत केवळ अनास्था आहे. दरवर्षी उन्हाळा उजाडला की पाणी टंचाई आढावा बैठक घ्यायची आणि आराखडा तयार करायचा आणि त्यानंतर काहीही होत नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी प्रांताधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या अडचणींची माहिती घेऊन सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.